Danish Kaneria shares Ram Mandir Video : सोमवारी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. देशाच्या कानाकोपऱ्यात या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा साजरा होत आहे. हा उत्सव केवळ भारतापुरता मर्यादित नाही. जगभरातील हिंदू हा सोहळा साजरा करत आहेत. पाकिस्तानच्या राम मंदिरातही हा खास सोहळा पार पडला, ज्यामध्ये माजदी क्रिकेटर दानिश कनेरियानेही सहभाग घेतला होता. कनेरियाने शेअर केलेला व्हिडीओ पाहता कराचीही राममय झाल्याचे दिसते.
दानिश कनेरियाने शेअर केला व्हिडीओ –
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने सोमवारी सकाळी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो आपल्या कुटुंबासह आणि इतरांसह राम मंदिर साजरा करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसणारे मंदिर हे कराचीमधील श्री स्वामी रामनारायण मंदिर आहे, ज्याला वडताल धाम असेही म्हणतात.
कराचीतील राम मंदिराचा व्हिडीओ –
दानिश कनेरियाने शेअर केलेल्या व्हिडीओत, त्याने गळ्यात उपरणं परिधान केल्याचे दिसते, ज्यावर कराची मंदिराचे नावही आहे. तसेच मंदिराच्या बाहेर फटाक्यांची आतषबाजी करून राम मंदिर सोहळा कसा साजरा करण्यात आला, हे व्हिडीओमध्ये दिसत आहे. कनेरिया पुजार्यांसोबत पूजा करताना दिसला. हे खास क्षण त्यांच्या पत्नीने टिपले. व्हिडिओच्या सुरुवातीला अयोध्येचे राम मंदिरही दिसत होते. हा व्हिडिओ कधीचा आहे, याची पुष्टी लोकसत्ता करत नाही.
दानिश कनेरिया हा रामभक्त आहे –
दानिश कनेरिया सोशल मीडियावर राम मंदिराबाबत सतत आपल्या भावना व्यक्त करत असतो. काही दिवसांपूर्वी दानिश कनेरियाने रामलल्लाचा फोटो शेअर केला होता. त्याने एक्सवर पोस्ट प्रभू रामचा फोटो शेअर करताना लिहले होते, ‘माझे रामलल्ला विराजमान झाले. दुसर्या एका पोस्टमध्ये तो हातात भगवा ध्वज घेऊन उभा असल्याचा दिसत आहे. या फोटोखाली कॅप्शने देताना लिहले होते, ‘आमच्या राजा श्री राम यांचे भव्य मंदिर तयार आहे, आता प्रतीक्षा फक्त काही दिवसांची आहे! बोला जय जय श्री राम.’