लोकपाल न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) दीपक वर्मा यांनी रविवारी मोहम्मद अझरुद्दीनला हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (एचसीए) अध्यक्षपद सोपवले आहे. भारताचा माजी कर्णधार अझरुद्दीनला निलंबित करणार्‍या अ‍ॅपेक्स काऊन्सिलच्या पाच सदस्यांनाही ‘तात्पुरते अपात्र’ ठरविण्यात आले. जॉन मनोज, उपाध्यक्ष आर विजयनंद, नरेश शर्मा, सुरेंद्र अग्रवाल आणि अनुराधा ही या पाच सदस्यांची नावे आहेत.

अ‍ॅपेक्स काऊन्सिलने आपल्या संविधानाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अझरुद्दीनच्या निलंबित केले होते. न्यायमूर्ती वर्मा यांनी आपल्या आदेशात म्हटले, “अझरुद्दीनविरूद्धची तक्रार लोकपालकडे पाठवली गेली नव्हती. अ‍ॅपेक्स कौन्सिल स्वतःहून असे निर्णय घेऊ शकत नाही. म्हणूनच, अध्यक्षाला निलंबित करण्यासाठी या पाच सदस्यांनी मंजूर केलेला ठराव रद्द करणे योग्य आहे.”

हेही वाचा – ‘‘धोनीसाठी कोणताही खेळाडू बंदुकीची गोळी खाण्यास तयार”

ते म्हणाले, ”म्हणूनच मी निर्देश देतो, की मोहम्मद अझरुद्दीन अध्यक्षपदावर राहिले पाहिजेत आणि पदाधिकाऱ्यांविरोधातील सर्व तक्रारी लोकपालच ठरवतील.” अझरुद्दीनने टीम इंडियाकडून ३०० पेक्षा जास्त एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि ९ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत.

नक्की प्रकरण काय?

टी-१० स्पर्धेत भाग घेणार्‍या दुबईस्थित खासगी क्रिकेट क्लबचा सदस्य असल्याचा आणि असोसिएशनला याबाबत न सांगण्याचा आरोप अझरुद्दीनवर लावण्यात आला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या स्पर्धेला मान्यता दिलेली नाही.

Story img Loader