टी-२० विश्वचषक २०२२ मधील निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियावर जोरदार टीका होत आहे. यासह, आता संपूर्ण जगाचे लक्ष एकदिवसीय क्रिकेटकडे वळले आहे. कारण पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे. त्याचबरोबर भारत देखील आयसीसी एकदिवसीय विश्वचषक यजमानपदासाठी सज्ज झाला आहे. अशात माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने भारतीय संघाल एक इशारा दिला आहे.
एकदिवसीय विश्वचषक २०२३ ही स्पर्धा भारतात खेळवली जाणारा आहे. त्यामुळे भारतीय संघाद्दल बोलायचे, तर एफटीपी कॅलेंडरनुसार, भारत विश्वचषकापूर्वी २५ एकदिवसीय सामने खेळणार आहे, त्यापैकी दोन आधीच न्यूझीलंडविरुद्ध चालू असलेल्या मालिकेत खेळले गेले आहेत. यावर आपले मत मांडताना भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफला वाटते की, व्यवस्थापनाने लवकरच विश्वचषकात खेळणाऱ्या खेळाडूंना ओळखण्याची गरज आहे.
भारत-न्यूझीलंड मालिकेचे अधिकृत प्रसारक प्राइम व्हिडिओवर बोलताना कैफ म्हणाला, “अलीकडेच विश्वचषक जिंकलेल्या इंग्लंड संघाचे सरासरी वय ३१ वर्षे होते. त्यामुळे अनुभवी खेळाडूंचा नेहमीच कोणत्या ना कोणत्या रुपाने उपयोग होतो. जर भारताला विश्वचषकाची तयारी सुरू करायची असेल, तर त्यांना न्यूझीलंडविरुद्धच्या सध्याच्या मालिकेपासून सुरुवात करावी लागेल. कारण आता फारसे एकदिवसीय सामने उरलेले नाहीत, कदाचित विश्वचषकापर्यंत फक्त २५ वनडे असतील.”
पुढे बोलताना कैफ म्हणाला, “टीम इंडियाची मुख्य समस्या गोलंदाजी आहे. जर तुम्ही पाहाल तर शार्दुल (ठाकूर) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळला नाही, तर तुम्ही (मोहम्मद) सिराजला मायदेशी पाठवले आहे, तो येथे एकदिवसीय सामन्यात खेळू शकला असता. भुवनेश्वर कुमार संघात का नाही, मला माहित नाही. तो चांगला गोलंदाज आहे, पण तो संघाचा भाग नाही. नवीन खेळाडूंच्या शोधात आपण जुने गमावत आहोत. एक म्हण आहे: हिऱ्यांच्या शोधात, आपण सोने गमावतो.”