भारतीय क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू नमन ओझाच्या वडिलांना अटक झाली आहे. मध्य प्रदेशातील मुलताई पोलिसांनी व्हीके ओझा यांच्यावर ही कारवाई केली आहे. त्यांच्यावर, २०१३ साली बँक ऑफ महाराष्ट्रच्या जौलखेडा शाखेत बनावट खाते उघडून किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुमारे १.२५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एफआयआर दाखल झाल्यापासून व्ही के ओझा फरार होते.
मुलताई पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील लता यांनी अटकेच्या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले की, पोलीस व्हीके ओझा यांचा शोध घेत होते. त्याच्यावर भारतीय दंड संहितेतील कलम ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२०बी, ३४ आणि आयटी कायद्याच्या कलम ६५,६६ अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणातील इतर सर्व आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जौलखेडा येथील बँकेचे शाखा व्यवस्थापक असताना ओझा यांनी सहकाऱ्यांच्या साथीने गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मुलताई पोलीस ठाण्यात २०१३ मध्ये आयपीसीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी मुलताई पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. तेथून त्यांना पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.
अभिषेक रत्नम नावाचा व्यक्ती २०१३ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या जौलखेडा शाखेमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. त्याने इतरांच्या मदतीने बँकेतून कर्ज घेण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. नंतर त्याची बदली झाली. २ जून २०१३ रोजी सुमारे ३४ बनावट खाती उघडण्यात आली आणि किसान क्रेडिट कार्ड कर्ज खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली. या खात्यांच्या मदतीने १.२५ कोटी रुपये काढण्यात आले. हा घोटाळा झाला तेव्हा व्ही के ओझा यांची शाखा व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाली होती. या गुन्ह्यात अन्य काही बँक कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये नमन ओझा हे मोठे नाव आहे. मात्र, महेंद्रसिंग धोनी आणि ऋद्धिमान साहासारख्या यष्टिरक्षकांमुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशा संधी मिळाल्या नाहीत. तो भारतासाठी फक्त एक एकदिवसीय सामना, एक कसोटी सामना आणि दोन टी ट्वेंटी सामने खेळू शकला. फेब्रुवारी २०२१ मध्ये तो निवृत्त झाला. मात्र, आता वडिलांच्या अटकेमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.