भारतात सुरू असलेली आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली. या स्पर्धेच्या आयोजनावर इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने टीका केली आहे. लोक मरत असताना ही स्पर्धा सुरू होती, असे हुसेनने एका वृत्तपत्रात लिहिलेल्या स्तंभात म्हटले आहे. आयपीएलमधील बायो बबलला करोनाने भेदल्यानंतर बीसीसीआयने मंगळवारी आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्याचे जाहीर केले.
हुसेन म्हणाला, “हे पाहणे एका पापासारखे आहे, जिथे स्पर्धा सुरू होती आणि लोक रस्त्यावर येऊन मरत होते. मला खेळाडूंवर टीका करायची नाही, पण स्पर्धा स्थगितच व्हायला हवी होती. भारतात ही स्पर्धा आयोजित करणे ही पहिली चूक होती. सहा महिन्यांपूर्वी यूएईमध्ये आयपीएल पार पडले, ते शानदार होते. करोनाची प्रकरणेही कमी होती. बायो बबलसुद्धा खूप मजबूत होता. त्यांनी तिथे परत जायला हवे. आयपीएल पुढे ढकलण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.”
तो पुढे म्हणाला, “खेळाडू मूर्ख किंवा असंवेदनशील नाहीत. त्यांना सध्या भारतात काय चालले आहे याची पूर्णपणे कल्पना होती. लोकांनी हॉस्पिटल, बेड आणि ऑक्सिजनसाठी आपले हात जोडल्याचे त्यांनी पाहिले. क्रिकेट मैदानाबाहेर उभी असलेली रिकामी रुग्णवाहिका त्यांना दिसत होती. हा खेळ सुरू ठेवण्याची हीच योग्य वेळ आहे, का याबाबत सर्वजण अस्वस्थ झाले होते.”
बीसीसीआयचे आश्वासन
चार संघांच्या खेळाडूंना आणि सहायकांना करोनाची बाधा झाल्याचे गेल्या दोन दिवसांत आढळून आल्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही स्पर्धा त्वरित स्थगित करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. आयपीएलचे सर्वच संघ बायो बबलमध्ये वावरत असल्यामुळे कोणालाही करोना संसर्ग होणार नाही, असा ठाम विश्वास फ्रेंचायझींच्या चालक-मालकांनी, तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने व्यक्त केला होता, तो फोल ठरला.
स्पर्धा स्थगित झाल्यामुळे बहुतेक सर्वच संघांशी संबंधित आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक, सहायकांच्या मायदेश माघारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऑस्ट्रेलियासारख्या देशाने भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. या खेळाडूंच्या माघारीचा निर्णय लवकरच घेऊ व शक्य तो सारी मदत करू, असे आश्वासन बीसीसीआयने दिले आहे.