पीटीआय, दुबई
भारताविरुद्ध सलग दोन कसोटी मालिकेतील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाकडून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी बरेच काही असेल. त्यामुळे पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ ३-१ असा विजय मिळवू शकतो, असे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंग यांनी सांगितले. भारताने ऑस्ट्रेलियाला गेल्या दोन दौऱ्यांमध्ये कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती. आता २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत जागतिक कसोटी क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे.
‘‘या मालिकेत दोन्ही संघांमध्ये चांगली प्रतिस्पर्धा पाहायला मिळेल. गेल्या दोन मालिकेत जे काही झाले, त्याच्याकडे पाहत ऑस्ट्रेलियाला चमकदार कामगिरी करण्याची संधी आहे. या दोन्ही संघांत पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. गेल्या काही काळात आम्ही केवळ चार कसोटी सामन्यांची मालिका खेळली आहे. यावेळी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेमुळे सर्व जण उत्साहित आहेत. मी निश्चितपणे ऑस्ट्रेलियन संघाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार समजेन. सामना बरोबरीत सुटू शकतो किंवा खराब हवामानाचा फटका सामन्याला बसू शकतो. त्यामुळे माझ्या मते ऑस्ट्रेलिया मालिका ३-१ अशी जिंकेल,’’ असे पॉन्टिंगने सांगितले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांमध्ये १९९१-९२ दरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका झाली होती. तेव्हा भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता.
हेही वाचा >>>Team India : BCCI ने भारताच्या वेळापत्रकात केला मोठा बदल, बांगलादेश आणि इंग्लंडविरुद्धची मालिका कधी होणार?
पॉन्टिंग यांना दोन्ही संघांचा गोलंदाजी मारा भक्कम असण्याची आशा आहे. ‘‘मोहम्मद शमी या मालिकेपूर्वी तंदुरुस्त होणे अपेक्षित आहे. मोहम्मद सिराजदेखील संघाबरोबर असेल. त्यातच जसप्रीत बुमराचीही भर पडेल. त्यामुळे दोन्ही संघांचा गोलंदाजी मारा भक्कम असेल,’’ असे पॉन्टिंगना वाटते.
स्टीव्ह स्मिथ सलामीला?
ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर स्टीव्ह स्मिथ सलामीला येणार का याबाबतच संभ्रम असेल. स्मिथ सलामीसाठी योग्य फलंदाज आहे का की स्मिथला सलामीलाच फलंदाजीसाठी यायचे आहे का याचा विचार करणे गरजेचे आहे. संघ व्यवस्थापनाला तो या स्थानासाठी योग्य फलंदाज वाटला नाही, तर ते यामध्ये बदल करतील आणि त्याच्याजागी पर्यायी फलंदाजाचा विचार केला जाईल. त्यातच अष्टपैलू कॅमेरून ग्रीनलाही संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे, असे पॉन्टिंगने सांगितले.
खलील अहमद संघात असावा…
पॉन्टिंगने डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद भारतीय संघात असावा असे म्हटले आहे. पॉन्टिंग दिल्ली कॅपिटल्समध्ये खलीलचे प्रशिक्षक राहिले आहेत. ते म्हणाले,‘‘खलील अहमदसारखा खेळाडू कसोटी मालिकेसाठी संघात असला पाहिजे. त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत सहभाग नोंदवला होता. भारतीय संघाला आपल्या कसोटी संघात डावखुरा गोलंदाज ठेवणे हे फायद्याचे असेल.’’
© The Indian Express (P) Ltd