भारतामध्ये क्रिकेट हा सर्वाधित लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेटची लोकप्रियता शिखरावर नेण्यासाठी गेल्या काही वर्षात इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलने मोठी भूमिका पार पाडली आहे. आयपीएलमुळे भारतात टी २० क्रिकेट फॉरमॅटला अल्पावधीत प्रचंड लोकप्रियता मिळाली. याच स्पर्धेचा आधार घेऊन महिला क्रिकेटलाही तितकीच प्रसिद्धी मिळवून देता येईल, असे क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे भारतात लवकच महिला आयपीएल क्रिकेट स्पर्धा (Women IPL) सुरू होईल, अशी आशा निवड समितीचे माजी सदस्य सबा करीम यांना आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) एक महिला आयपीएल सुरू करण्याची योजना आखत आहे. सुरुवातीला यामध्ये सहा संघ असतील. ही स्पर्धा सुरू केल्यास चॅलेंजर ट्रॉफी बंद होईल. पुरुषांच्या आयपीएलमधील, पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघमालकांनी महिलांच्या आयपीएलमध्ये स्वारस्य दाखवले आहे. संधी मिळाल्यास ते संघांसाठी बोली लावू इच्छितात. त्यामुळे महिला आयपीएल सुरू होईल, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, आता माजी क्रिकेटपटू सबा करीम यांनी आपले मत व्यक्त करताना स्पर्धेच्या निश्चिततेवर जवळपास शिक्कामोर्तब केले आहे.

हेही वाचा – Photos: टेबल टेनिस ते वेटलिफ्टिंग राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांचा पाऊस सुरूच; उंच उडीतही भारताला ऐतिहासिक कांस्य

‘सध्या भारतीय महिला क्रिकेट संघ चांगली कामगिरी करत आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील (CWG 2022) टी २० क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ही परिस्थिती महिला आयपीएल सुरू करण्यासाठी अनुकूल आहे. त्यामुळे लवकरच भारतात महिलांचेही आयपीएल सुरू होईल,’ असे सबा करीम म्हणाले आहेत.

हेही वाचा – India W vs Barbados W T20 in CWG 2022: बार्बाडोसचा पराभव करून भारताची उपांत्य फेरीत धडक; जेमिमाह अन् रेणुकाची शानदार कामगिरी

सबा करीम यांनी काही काळ बीसीसीआयमध्ये क्रिकेट ऑपरेशन्ससाठी महाव्यवस्थापक म्हणून काम केले होते. त्यांचा विश्वास आहे की महिलांचे आयपीएल सुरू करण्यासाठी हीच वेळ योग्य आहे. न्यूज १८शी बोलताना ते म्हणाले, “महिला आयपीएलची लवकरच त्याची सुरुवात झाली पाहिजे आणि ते लवकर सुरू होईल, अशी मला आशा आहे. बीसीसीआयमध्ये या प्रकरणी चर्चा सुरू आहे. महिला क्रिकेटसाठी ही खूप चांगली गोष्ट ठरले. तसंही गेल्या तीन ते चार वर्षापासून आपल्याकडे आयपीएलच्या धर्तीवर महिलांचे प्रदर्शनीय टी २० सामने होतच आहेत.”

करीम यांना वाटते की, महिला आयपीएल देशातील महिला क्रिकेटच्या विकासासाठी आश्चर्यकारक कामगिरी करेल. राष्ट्रीय संघातील अनेक खेळाडूंनीही महिला आयपीएल खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे जर महिला आयपीएल स्पर्धा पार पडली तर ती भारतातील महिला क्रिकेटसाठी एक चांगली बातमी असेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former cricketer saba karim is hopeful about women ipl vkk