भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर यांनी सनरायझर्स हैदराबादच्या निवड धोरणावर जोरदार टीका केली आहे. ही टीम जिंकण्यास पात्र नाही, असेही ते म्हणाले. चेन्नईत मुंबई इंडियन्सने हैदराबादला 13 धावांनी पराभूत केले. या सामन्यानंतर मांजरेकरांनी हैदराबादला लक्ष्य केले.
मुंबईविरुद्धच्या सामन्यात हैदराबादने चार बदल केले. त्यांनी संघात अभिषेक शर्मा, विराट सिंह आणि मुजीब उर रेहमान आणि खलील अहमद या खेळाडूंचा केला. मांजरेकर म्हणाले, ”मला माफ करा, परंतु जर एखाद्या संघाने अभिषेक शर्मा, विराट सिंह आणि अब्दुल समद या तीन खेळाडूंना अंतिम अकरामध्ये एकत्र निवडले, तर तो संघ विजयासाठी पात्र नाही.
Sorry to say, but anyone that picks Abhishek Sharma, Virat Singh and Abdul Samad all together in one playing XI does not deserve to win.
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) April 17, 2021
मुंबईला 150 धावांपर्यंत रोखल्यानंतर हैदराबादसाठी जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण हे दोघे बाद होताच हैदराबादचा डाव गडगडला. मनीष पांडे (2), विराट सिंग (11), अभिषेक शर्मा (2) आणि अब्दुल समद (7) हे खेळाडू मोठे योगदान न देता माघारी परतले आणि संघाला त्याची किंमत मोजावी लागली.
2016मध्ये आयपीएलचे जेतेपद पटाकावलेल्या हैदराबादने अजून अनुभवी केदार जाधवला संघात संधी दिलेली नाही. केन विल्यमसन सामन्यांसाठी पूर्णपणे फिट नाही. सामना संपल्यानंतर कर्णधार वॉर्नरने आपल्या फलंदाजीबद्दल नाराजी व्यक्त केली.