महिला टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. भारताच्या जेमिमाह रॉड्रिग्स-रिचा घोषच्या जोडीने जोरदार फटकेबाजी करत १९ व्या षटकात भारताला विजय मिळवून दिला. हा सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे खेळला गेला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतापुढे २० षटकांत १४९ घावाचं लक्ष्य ठेवलं. भारताने १९व्या षटकात तीन विकेट्सच्या बदल्यात मोठा विजय संपन्न केला आहे. जेमिमाह रॉड्रिग्स-रिचा घोषच्या जोडीने अफलातून फलंदाजी केली.
महिला टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नमवल्यानंतर भारतीय संघाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत भारतीय महिला संघाचं कौतुक केलं आहे. भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागसह अनेक क्रिकेटर्सने ट्वीट करत महिला संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
सेहवाग आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला, “चक दे पठ्ठे! विश्वचषकात भारताने पाकिस्तानला पराभूत केलेलं पाहण्यासाठी नेहमीप्रमाणेच खूप उत्साही आहे. भारतीय महिला संघाने अप्रतिम कामगिरी केली. शेवटच्या षटकांत रिचाने खेळ फिरवला जेमिमाहनेही अप्रतिम खेळी केली. मोठा विजय…”
दुसरीकडे, दिनेश कार्तिकने ट्वीट करत म्हटलं, “भारताने शानदार कामगिरी केली. संपूर्ण खेळपट्टीचा वापर कसा करावा, याचं उत्तम उदाहरण जेमिमाहने दाखवलं. रिचा प्रत्येक सामन्यात चांगल्या प्रकारे खेळी साकारत आहे.”