IND vs AUS 1st ODI Match Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. रोमहर्षक बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर आता सर्वांच्या नजरा या दोन्ही संघांमधील वनडे मालिकेवर खिळल्या आहेत. या वर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे, त्या दृष्टीनेही या मालिकेचे महत्त्व अधिक आहे. दरम्यान माजी किकेटपटू वसीम जाफरने टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन निवडली आहे.
हार्दिक पहिल्या वनडेत संघाची कमान सांभाळणार –
भारतीय संघ पहिल्या सामन्यात रोहित शर्माशिवाय मैदानात उतरणार आहे. संघाची कमान हार्दिक पांड्याकडे असेल. हार्दिकने टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधारपदाची क्षमता सिद्ध केली आहे. अशा स्थितीत हार्दिकच्या नेतृत्वाखाली कोणत्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल, याबाबत माजी कसोटीपटू वसीम जाफरने अंदाज वर्तवला आहे.
केएल राहुलचाही इलेव्हनमध्ये समावेश –
रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत वसीम जाफरने केएल राहुलचा भारतीय प्लेइंग-११ मध्ये समावेश केला आहे. मात्र त्याने राहुलला सलामीवीर म्हणून संघात स्थान दिलेले नाही. संघात सलामीवीर म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या शुबमन गिल आणि इशान किशन या जोडीला स्थान देण्यात आले आहे. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल. दुसरीकडे, चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आपली धडाकेबाज फलंदाजी सादर करेल. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी केएल राहुलची जाफरने निवड केली आहे.
शमी आणि सिराज वेगवान गोलंदाजीची कमान सांभाळतील –
जाफरने संघात संतुलन राखण्यासाठी तीन अष्टपैलू खेळाडूंचा समावेश केला आहे. हार्दिक पांड्या फलंदाजीसोबतच वेगवान गोलंदाजीतही योगदान देईल. त्याचबरोबर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे फिरकी अष्टपैलू म्हणून संघात असतील. या दोन फिरकीपटूंना साथ देण्यासाठी जाफरने कुलदीप यादवचीही संघात निवड केली आहे. ज्यांचा कांगारूंविरुद्धचा विक्रम उत्कृष्ट आहे आणि एकदिवसीय सामन्यात त्यांच्याविरुद्ध हॅट्ट्रिकही घेतली आहे. वेगवान गोलंदाजीसाठी जाफरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या जगातील नंबर वन गोलंदाजांची निवड केली आहे. या दोघांना साथ देण्यासाठी हार्दिक पांड्या उपस्थित राहणार आहे.
हेही वाचा – Babar Azam: IPL की BBL? बाबर आझमने निवडली आपली आवडती लीग, जाणून घ्या कारण
पहिल्या वनडेसाठी जाफरने निवडली भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पांड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.