इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गनने काही दिवसांपूर्वीच सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याच्या जागी कर्णधार म्हणून बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांची वर्णी लागली आहे. मात्र, निवृत्ती घेतल्यानंतर काही महिन्याच मॉर्गन क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार आहे. आपल्या नेतृत्वाखाली इंग्लंडला पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून देणारा इऑन मॉर्गन लिजेंड्स क्रिकेट लीगच्या दुसऱ्या सत्रात खेळताना दिसणार आहे.
गेल्या आठवड्यामध्ये ‘लिजेंड्स क्रिकेट लीग’ स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राची घोषणा करण्यात आली आहे. यंदा या स्पर्धेत चार संघ सहभागी होणार असून ११० आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळताना दिसणार आहेत. वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांसारखे माजी भारतीय क्रिकेटपटूदेखील लेजेंड्स क्रिकेट लीगच्या (एसएलसी) दुसऱ्या सत्रात खेळताना दिसणार आहेत. त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली, श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन आणि इंग्लंडचा इयॉन मॉर्गनदेखील या स्पर्धेत सहभागी होणार आहे.
एलएलसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमण रहेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ११० खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ऑगस्टच्या सुरुवातीला त्यांची चार संघांमध्ये विभागणी केली जाईल. या स्पर्धेत भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेचे खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत सहभाग घेण्याबाबत मॉर्गन म्हणाला, “ही खूप आनंदाची गोष्टी आहे आणि मी लीगचा भाग होण्यासाठी खूप उत्साहित आहे.”