Stuart Broad names India as ICC World Cup 2023 title contender: एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेला यंदा भारतात ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा भारतातील वेगवेगळ्या १० स्टेडियमवर खेळली जाणार आहे. तसेच विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना १९ नोव्हेंबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियवर खेळला जाणार आहे. तत्पुर्वी सध्या सर्व आपापले सराव सामने खेळण्यात व्यस्त आहे. अशात इंग्लंडचा माजी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने स्पर्धेत कोणत संघ चषकावर नाव कोरेल याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
भारताला रोखणे कठीण होईल –
इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड भारताला २०२३ चा विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार असल्याचे मानतो. जर स्पर्धेतील सर्व काही यजमान संघाच्या योजनेनुसार झाले, तर त्यांना विजेतेपद पटकावण्यापासून रोखणे फार कठीण आहे. स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला की, “जर इंग्लंडने आपले विश्वचषक विजेतेपद राखण्यात यश मिळवले तर ते विलक्षण असेल. मात्र, मला वाटते की जर भारताने आपली आदर्श स्पर्धा खेळली तर त्यांना रोखणे खूप कठीण होईल. तो म्हणाला, जोस बटलरकडे निश्चितच आव्हानात्मक संघ आहे, ज्याच्यात मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता आहे, परंतु मला वाटते की यजमान आणि अव्वल क्रमांकाचा वनडे संघ या नात्याने भारतासाठी त्यावर मात करणे खूप कठीण जाईल.”
अलीकडील इतिहास काय सांगतो?
डेली मेलने ब्रॉडचा हवाला देत म्हटले आहे की, “अलीकडील इतिहास तुम्हाला दाखवतो की घरच्या संघांनी ५० षटकांच्या विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. २०११ चा विश्वचषक भारतात होता आणि विजेतेपदही भारतानेच पटकावले. तसेच २०१५ विश्वचषकाचे यजमानपद ऑस्ट्रेलियाकडे होते आणि त्यांनी विश्वचषकावर नाव कोरले. त्याचबरोबर २०१९ मध्ये सुद्धा हेच पाहिला मिळाले. कारण विश्वचषक इंग्लंडमध्ये होता आणि विजेतेपदही त्यांनी पटकावले . त्यानुसार यंदा भारतालाही त्याचा फायदा होईल.”
भारत आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज –
भारताने शेवटचा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता, जेव्हा त्यांनी २०११ मध्ये इंग्लंडमध्ये १९८३ ची आवृत्ती जिंकल्यानंतर स्पर्धेचे सह-यजमानपद भूषवले होते. यावेळी भारत विश्वचषकातील सर्व सामने एकट्याने आयोजित करणार आहे. त्यामुळे कोणत्याही संघाला घरच्या मैदानावर भारताला आव्हान देणे कठीण होईल. गेल्या महिन्यात आशिया कपवर कब्जा केल्यानंतर भारताच्या नजरा विश्वचषकावर आहेत. टीम इंडिया लवकरच आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवेल, असे अनेक तज्ज्ञ आणि दिग्गज क्रिकेटपटूंचे मत आहे, भारत ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल.