स्कीइंग करताना गंभीर जखमी झालेला फॉम्र्युला-वन शर्यतीच्या माजी विश्वविजेत्या मायकेल शूमाकरची स्थिती चिंताजनक आहे. त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, मात्र सध्या तो कोमात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
‘‘या अपघातामुळे शूमाकरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, ज्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. ही शस्त्रक्रिया झाली आहे, मात्र आताही तो कोमात आहे,’’ असे ग्रेनोबलमधील रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जर्मनीचा ४४ वर्षीय शूमाकर आपल्या १४ वर्षांच्या मुलासह मेरिबेल रिसॉर्ट परिसरात स्कीइंग करत होता. त्याच परिसरात त्याचे घर आहे. स्कीइंग करताना तो पडला आणि त्याचे डोके दगडावर आदळले. हवाई रुग्णवाहिकेद्वारे त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. अत्याधुनिक उपचारांसाठी त्याला ग्रेनोबल येथे हलवण्यात आले. शूमाकरवर उपचार करण्यासाठी मेंदूचे विशेषज्ञ असलेल्या डॉक्टरांना खास पॅरिसहून पाचारण करण्यात आले आहे.
शूमाकरने स्कीइंगच्या वेळी आवश्यक हेल्मेट परिधान केले होते, तो बेशुद्ध पडला मात्र हेल्मेटमुळे जीवघेण्या दुखापतींपासून बचावला, असे मेरिबेल रिसॉर्टचे संचालक ख्रिस्तोफे जर्जिऑन लेकोम्ट यांनी सांगितले. मात्र शूमाकर कोमात गेल्याने त्याच्या दुखापतींचे स्वरूप गंभीर असल्याची डॉक्टरांना जाणीव झाली.

Story img Loader