पीटीआय, कोलकाता : भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार आणि ऑलिम्पिकपटू समर बॅनर्जी यांचे शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. फुटबॉल जगतात ‘बद्रु दा’ या नावाने परिचित असलेले बॅनर्जी गेली काही वर्षे अल्झायमर आणि अझोटेमियाने आजारी होते. तसेच करोनाची बाधा झाल्याने त्यांना २७ जुलैला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे शनिवारी दुपारी निधन झाल्याची माहिती मोहन बागान फुटबॉल क्लबचे सचिव देबाशीष दत्ता यांनी दिली.
भारतीय फुटबॉल संघ आतापर्यंत तीन वेळा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. १९५६च्या ऑलिम्पिकमध्ये बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली भारताने चौथे स्थान मिळवले होते. कांस्यपदकाच्या लढतीत भारताला बल्गेरियाविरुद्ध ०-३ असा पराभव पत्करावा लागला होता. भारताची ऑलिम्पिकमधील हीच सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. भारतीय फुटबॉलचा हा सुवर्णकाळ मानला जात होता. त्या ऑलिम्पिकमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा ४-२ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली होती. मात्र, उपांत्य फेरीत भारताचा युगोस्लाव्हियाकडून १-४ असा पराभव झाला होता.
भारतातील देशांतर्गत फुटबॉलमध्ये बॅनर्जी यांचा समावेश असलेल्या मोहन बागान संघाने पहिल्यांदा डय़ुरँड चषक (१९५३) पटकावला होता. त्यानंतर बागानने रोव्हर्स चषक (१९५५) स्पर्धाही जिंकली. दोन वेळा संतोष चषक (१९५३, १९५५) जिंकणाऱ्या बागान संघाचाही ते भाग होते. त्यांनी भारतीय संघाचे निवड समिती सदस्य म्हणूनही काम पाहिले. त्यांना २००९मध्ये ‘मोहन बागान रत्न’ पुरस्काराने सन्मानित केले होते.