पॅरिस : फ्रान्सचे माजी दिग्गज फुटबॉलपटू, १९५८च्या विश्वचषक स्पर्धेत विक्रमी १३ गोल झळकावणारे जस्ट फॉन्टेन यांचे बुधवारी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.स्वीडन येथे झालेल्या १९५८ सालच्या विश्वचषक स्पर्धेसाठी फॉन्टेन यांचा अखेरच्या क्षणी फ्रान्सच्या संघात समावेश करण्यात आला होता. मोरोक्कोमध्ये जन्मलेल्या फॉन्टेन यांचा त्यावेळी फारसा नावलौकिक नव्हता.
मात्र, या स्पर्धेच्या सहा सामन्यांत त्यांनी १३ गोल झळकावले आणि एका विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक गोलचा विक्रम आपल्या नावे केला. तिसऱ्या स्थानासाठी पश्चिम जर्मनीविरुद्ध झालेल्या लढतीत त्यांनी चार गोल केले होते. आघाडीपटू फॉन्टेन हे आपल्या वेगासाठी आणि गोल करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जायचे. फॉन्टेन यांनी कारकीर्दीत एकूण २१३ सामन्यांत २०० गोल केले. तर, फ्रान्ससाठी त्यांनी २१ सामन्यांत ३० गोल झळकावले.