हरियाणातल्या एका ठगाला नवी दिल्लीतल्या चाणक्यपुरी पोलिसांनी अटक केली आहे. या ठगाने राष्ट्रीय स्तरावर हरियाणाच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. या आरोपीचं नाव मृणांक सिंह असं आहे. त्याने जुलै २०२२ मध्ये दिल्लतल्या ताज पॅलेस हॉटेलची ५.५३ लाख रुपयांना फसवणूक केली होती. तेव्हा त्याने दावा केला होता की, तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्व करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मृणांक सिंह याने तो कर्नाटकमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याचा बनाव रचून देशभरात अनेक आलिशान हॉटेलांची, हॉटेल मालकांची, त्यांच्या व्यवस्थापकांची आर्थिक फसवणूक केली असल्याचं पोलीस तपासांत उघड झालं आहे. त्याने प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचीही फवणूक केली आहे. २०२०-२१ मध्ये त्याने ऋषभ पंतला १.६३ कोटींचा गंडा घातला होता.

मृणांक सिंहने बार, रेस्तराँ, तरुणी, मॉडेल्स, कॅबचालक, छोट्या दुकानांसह अनेक लोकांना लुबाडलं आहे. त्याच्या मोबाईलची प्राथमिक तपासणी केली असता तो अनेक मॉडेल्स आणि तरुणींच्या सातत्याने संपर्कात होता. या तरुणी आणि मॉडेल्सचे असंख्य फोटो आणि व्हिडीओ त्याच्या फोनमध्ये आहेत. यातले बरेचसे फोटो आणि व्हिडीओ आक्षेपार्ह असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

दरम्यान, मृणांकला न्यायालयासमोर हजर करून पोलिसांनी त्याची दोन दिवसांची कोठडी मिळवली आहे. या प्रकरणी पोलीस त्याची चौकशी करत आहेत. आयटी तज्ज्ञांकडून त्याच्या फोनची तपासणी केली जाणार आहे. मृणांकने अनेक लोकांना लुबाडल्याची प्रकरणं समोर येतील. पुढील तपासांत अनेक पीडितांची नावं समोर येतील, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

या आरोपीविरोधात ताज पॅलेस हॉटेलने ऑगस्ट २०२२ मध्ये नवी दिल्लीतल्या चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत म्हटलं होतं की, आपण भारतीय क्रिकेटपटू असल्याचा दावा करत मृणांक सिंह २२ जुलै ते २९ जुलै २०२२ पर्यंत हॉटेलात राहिला. हॉटेलचं ५,५३,३६२ रुपयांचं बिल न भरता तिथून निघून गेला. हॉटेलने त्याच्याकडे पैसे मागितल्यावर तो म्हणाला, अ‍ॅडिडास कंपनी त्याचे पैसे भरेल. त्यानंतर हॉटेलने त्याला सर्व बिलं ईमेलद्वारे पाठवली होती. त्यानंतर त्याने दोन लाख रुपये ऑनलाईन पाठवले असल्याचं उत्तर दिलं. तसेच एक यूटीआर नंबरही पाठवला. परंतु, असं कोणतंही पेमेंट हॉटेलला मिळालं नव्हतं. त्यानंतर हॉटेलच्या व्यवस्थापकांनी पोलिसांत धाव घेतली.

हे ही वाचा >> ऑलिम्पिक असोसिएशनचा मोठा निर्णय, कुस्ती महासंघाचा कारभार पाहण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठित

पोलिस मिळालेल्या माहितीच्या आधारे मृणांक सिंहला पकडण्यासाठी दिल्ली विमानतळावर गेले. तिथे तो पोलिसांना म्हणाला मी कर्नाटकमधील आयपीएस अधिकारी आहे. एडीजीपी आलोक कुमार असं आपलं नावं असल्याचं त्याने पोलिसाना सांगितलं. पोलिसही काही क्षण गोंधळले, अखेर त्यांनी मृणांक सिंहच्या मुसक्या आवळल्या.