भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी २०१९मध्ये सिडनी येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यानंतर कुलदीप यादवला परदेशातील भारताचा प्रमुख फिरकीपटू असे संबोधले होते. संघ-सहकारी या नात्याने कुलदीपसाठी आनंद वाटला, तरी शास्त्री यांच्या विधानामुळे दुखावलो, असे भारताचा ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘शास्त्री यांच्याविषयी माझ्यासह सर्वांनाच खूप आदर आहे. मात्र, शास्त्री यांनी त्या वेळी केलेल्या विधानामुळे मी दुखावला गेलो. संघातील सहकाराऱ्यांचे यश साजरे करण्याबाबत आम्ही कायम चर्चा करतो. मला ऑस्ट्रेलियात कसोटीच्या एका डावात पाच गडी कधीही बाद करता आलेले नाहीत; पण कुलदीपने ती कामगिरी केली. त्यामुळे त्याच्या या यशाचे महत्त्व मला ठाऊक आहे,’’ असे अश्विन म्हणाला. कुलदीपने त्या सामन्याच्या पहिल्या डावात पाच गडी बाद केले होते. 

तसेच २०१८ ते २०२० या कालावधीत अश्विनने बऱ्याचदा निवृत्तीचाही विचार केला. ‘‘दोन वर्षांच्या कालावधीत अनेकदा क्रिकेट सोडण्याचा विचार माझ्या मनात आला. प्रचंड मेहनत घेऊनही मला अपेक्षित यश प्राप्त होत नव्हते. त्यातच पायालाही दुखापतीमुळे मी निराश झालो होतो,’’ असेही तो म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former head coach of the indian cricket team ravi shastri sydney india leading spinner ravichandran ashwin akp