नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार दिलीप तिर्कीची ‘हॉकी इंडिया’ संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. ‘हॉकी इंडिया’च्या अध्यक्षपदासाठी प्रतिस्पर्धी दोन उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर शुक्रवारी तिर्कीची निवड निश्चित झाली. संपूर्ण कार्यकारिणीची निवड बिनविरोध झाली असून, याला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) मान्यता दिली आहे. ‘हॉकी इंडिया’चे अध्यक्षपद भूषविणारा तिर्की हा पहिला हॉकीपटू ठरणार आहे.
‘एफआयएच’ आणि प्रशासकीय समितीने ऑगस्टमध्ये ‘हॉकी इंडिया’ला ९ ऑक्टोबरपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. तिर्कीने १८ सप्टेंबर रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश हॉकीचे प्रमुख राकेश कटय़ाल आणि हॉकी झारखंडचे भोलानाथ सिंग यांनीही अर्ज भरले होते. मात्र, निवडणुकीपूर्वीच त्यांनी माघार घेतल्याने तिर्कीची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदासाठी माघार घेतल्यानंतर भोलानाथ सिंग यांची ‘हॉकी इंडिया’च्या सरचिटणीसपदी वर्णी लागली.
अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर तिर्कीने भारतीय हॉकीला नव्या उंचीवर नेण्यासाठी मी कटिबद्ध असेन, असा विश्वास व्यक्त केला. ‘एफआयएच’नेही निवडणुकीला मान्यता देताना तिर्कीचे अभिनंदन केले. ‘‘प्रशासकीय समितीने ‘हॉकी इंडिया’ची निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली. अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल तिर्कीचे अभिनंदन.’’ असे ‘एफआयएच’ने म्हटले आहे.
कार्यकारिणी
अध्यक्ष : दिलीप तिर्की, उपाध्यक्ष : असिमा अली, एस. व्ही. एस. सुब्रमण्या गुप्ता; सरचिटणीस : भोलानाथ सिंग, खजिनदार : शेखर मनोहरन, सहसचिव : आरती सिंग, सुनील मलिक, समिती सदस्य : अरुण कुमार सारस्वत, अस्रिता लाक्रा, गुरप्रीत कौर, व्ही. सुनील कुमार, तपन कुमार दास.