नवी दिल्ली : वाढत्या ट्वेन्टी-२० लीगमुळे क्रिकेट फुटबॉलच्या वाटेवर जात असून, भविष्यात क्रिकेटपटूंना केवळ जागतिक स्पर्धा खेळण्यातच रस वाटेल, असे परखड मत भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.
जगभरातील वाढत्या टवेन्टी-२० लीगचा फटका द्विपक्षीय क्रिकेट मालिकेला बसत आहे. जास्तकरून यात एकदिवसीय क्रिकेट भरडले जात आहे. खेळाडूंशी प्रदीर्घ मुदतीचे करार केले जात असल्यामुळे लीगमधील संघांचेही महत्त्व वाढणार आहे, अशी शंकाही शास्त्री यांनी या वेळी बोलून दाखवली.
‘‘या सगळय़ांमुळे खेळाडू केवळ विश्वचषक स्पर्धेसाठीच राष्ट्रीय संघात एकत्र येतील. अर्थात, यासाठी संघांनी खेळाडूंना मुक्त करायला हवे. खेळाडूंनी मुक्त केल्यानंतरच ते विश्वचषक स्पर्धेत खेळू शकतील,’’ असेही शास्त्री म्हणाले.
अर्थात, अशी शक्यता प्रत्यक्षात आल्यास आपल्याला आश्चर्य वाटणार नाही किंवा मला वाईटही वाटणार नाही, असेही शास्त्री म्हणाले. आपल्या भूमिकेचे समर्थन करताना शास्त्री म्हणाले, ‘‘याचा सर्वात मोठा फटका एकदिवसीय क्रिकेटला बसेल. आताच अनेक क्रिकेटपटू देशापेक्षा क्लबकडून खेळण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत. खेळाडूंमधील ही भावना भविष्यात वाढीस लागणार यात शंकाच नाही.’’