पीटीआय, नवी दिल्ली
भारतात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत वर्चस्व कायम राखून विजेतेपदाची संधी साधली नाही, तर भारताला विजेतेपदासाठी आणखी तीन स्पर्धा प्रतीक्षा करावी लागेल, असे मत भारताचे माजी कर्णधार रवी शास्त्री यांनी मांडले.
‘‘या स्पर्धेत संघातील प्रत्येक खेळाडू चांगल्या लयीत आहे. भारताने विजेतेपद मिळवून आता बारा वर्षे झाली आहेत. भारतीय संघाची सध्याची कामगिरी बघितली, तर भारताला विजेतेपद मिळविण्याची चांगली संधी आहे,’’असेही शास्त्री म्हणाले.
‘‘भारताच्या कामगिरीत सध्या तरी चांगले सातत्य दिसून येत आहे. संघातील सात ते आठ खेळाडू त्यांच्या सर्वोत्तम लयीत दिसून येत आहेत. त्यामुळे जर भारताने या वेळी संधी गमावली, तर त्यांना आणखी तीन ते चार स्पर्धाची प्रतीक्षा करावी लागेल. भारतीय उपखंडात खेळताना त्यांना हव्या तशा खेळपट्टी मिळत आहेत. त्यांच्यासाठी ही निश्चित विजेतेपदाची अखेरची संधी असेल,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.
हेही वाचा >>>VIDEO: विराटने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही केली कमाल, तब्बल ९ वर्षानंतर वनडे क्रिकेटमध्ये घेतली विकेट
शास्त्री यांनी या वेळी गोलंदाजीचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘खूप वर्षांनी भारतीय गोलंदाजी चर्चेचा विषय ठरली आहे. जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांचा थाट काही वेगळाच दिसून येत आहे. रवींद्र जडेजा, कुलदीप यादव या फिरकीपटूंनीही प्रतिस्पर्धी संघांच्या अडचणीत भर घातली आहे. वेगवान आणि फिरकी गोलंदाजीचा चांगला समतोल राखला गेला आहे. आजपर्यंतची ही सर्वोत्तम गोलंदाजीची फळी आहे असे म्हटले तर चूक ठरणार नाही.’’
‘‘भारतीय गोलंदाजीची कामगिरी ही लगेच झालेली नाही. यामागे खूप वर्षांची मेहनत आहे. गेली चार ते पाच वर्षे ते खेळत आहेत. सिराज तीन वर्षांपूर्वी संघात आला. इतकी वर्षे खेळून त्यांनी आपल्याला नेमका कुठे मारा करायचा हे अचूक हेरले आहे. त्यांनी कामगिरीत सातत्य राखले हे संघाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या स्पर्धेत त्यांनी खूप कमी वेळा आखूड टप्प्याचे चेंडू टाकले आहेत. त्यांनी आखूड टप्प्याच्या चेंडूचा राखीव अस्त्र म्हणून उपयोग केला आहे,’’ असेही शास्त्री म्हणाले.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सफेद चेंडूचा वापर सुरू झाल्यापासून गेल्या ५० वर्षांत ही भारताच्या गोलंदाजींची सर्वोत्तम कामगिरी आहे, यात काहीच शंका नाही. – रवी शास्त्री