काही दिवसांपासून सुरु असलेल्या मिताली राज-रमेश पोवार प्रकरणात माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मिताली राज हिला पाठिंबा दर्शविला आहे. मला मितालीबद्दल सहानुभूती वाटते. तिचा मुद्दा योग्यच आहे. कारण काहीही असले तरी मितालीसारख्या संघाबाहेर बसवणे योग्य नव्हते, अशा शब्दात त्यांनी आपले परखड मत व्यक्त केले आहे.
मितालीला वर्ल्डकप टी-२० स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात वगळण्यात आले होते. त्या लढतीत भारताला पराभव स्वीकारावा लागला आणि भारताचे आव्हान संपुष्टात आले. यानंतर मितालीला सांगतून वगळल्याचा फटका बसल्याची चर्चा सुरू झाली आणि प्रश्न उपस्थित उपस्थित झाले. या प्रकरणाबाबत गावसकर म्हणाले की मला मितालीबद्दल सहानुभूती वाटते. तिने २० वर्षे भारतीय क्रिकेटला दिली. महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत दोन सामन्यात ती सर्वोत्तम खेळाडूही ठरली. त्यामुळे कारण काहीही असले तरी मितालीसारख्या संघाबाहेर बसवणे योग्य नव्हते.
‘मितालीला एका सामन्यात दुखापतीमुळे खेळता आले नाही. पण पुढच्या सामन्यात ती तंदुरुस्त होती. हाच प्रकार पुरुषांच्या संघाबाबत झाला असता आणि मितालीच्या जागी विराट कोहली असता, तर त्याला बाहेर बसवता आले असते का?, असा सवाल त्यांनी केला.
उपांत्य फेरीसारख्या सामन्यात तुम्ही सर्वोत्तम खेळाडूंना संधी द्यायला हवी. मितालीच्या अनुभवाचा उपयोग करून घेणे त्यावेळी महत्वाचे असते. एका जागी बसून रमेश पोवार यांच्या निर्णयाबाबत बोलणे शक्य नाही. पण विजयी संघच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्याचे कारण मात्र न पटणारे आहे, असेही त्यांनी नमूद केले.