वृत्तसंस्था, नवी दिल्ली
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेअंती भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा निवृत्ती घेऊ शकेल अशी चर्चा रंगली होती. मात्र, अंतिम लढत जिंकल्यानंतर स्वत: रोहितने या चर्चांना पूर्णविराम दिला. माजी कसोटी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनीही रोहितला पाठिंबा दर्शविला आहे. निवृत्तीसाठी रोहितवर दडपण आणणे योग्य नसून त्याच्यासारख्या दिग्गज खेळाडूने आपल्या भविष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार कमावला आहे, असे मत वेंगसरकर यांनी व्यक्त केले.
अंतिम लढतीनंतरच्या पत्रकार परिषदेत रोहितने आपण एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत नसल्याचे स्पष्ट केले होते. पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा २०२७ मध्ये होणार आहे. तोपर्यंत आपण खेळणार असे रोहितने सांगितले नसले, तरी त्याच्या उपस्थितीचा भारतीय संघाला फायदाच होईल असे वेंगसरकर यांना वाटते.
‘‘मी ज्योतिषी नाही. त्यामुळे रोहित नक्की किती काळ खेळणार हे मी सांगू शकत नाही. २०२७च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपूर्वी बरेच सामने होतील. या सामन्यांत तो कशी कामगिरी करतो आणि तो किती तंदुरुस्त राहतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. त्याने कर्णधार आणि खेळाडू म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच्या निवृत्तीबाबत इतकी चर्चा का होते हेच मला कळत नाही,’’ असे वेंगसरकर म्हणाले.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आठ महिन्यांच्या कालावधीत ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स करंडक अशा ‘आयसीसी’च्या सलग दोन स्पर्धा जिंकण्याची किमया साधली. या दोनही स्पर्धांमध्ये फलंदाजीसाठी आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर रोहितने काही महत्त्वाच्या खेळी केल्या.
‘‘गेल्या काही वर्षांत रोहित ज्या प्रकारे फलंदाजी करत आहे, ते अनुकरणीय आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावे तीन द्विशतके आहेत. त्याची गुणवत्ता यावरूनच सिद्ध होते. रोहित आणि विराटसारखे खेळाडू सामना जितका मोठा असेल, तितकी आपली कामगिरी उंचावतात. त्यांची भूमिका संघासाठी खूप महत्त्वाची ठरते. त्यांची मैदानातील उपस्थितीही प्रतिस्पर्ध्यांवर दडपण आणते,’’ असे वेंगसरकर यांनी नमूद केले.
क्रमवारीत तिसऱ्या स्थानी
चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम फेरीतील चमकदार कामगिरीच्या जोरावर रोहितने ‘आयसीसी’च्या एकदिवसीय क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. रोहितचा सलामीचा जोडीदार शुभमन गिल क्रमवारीतील अग्रस्थान राखून आहे.
‘पुढील विश्वचषकात खेळण्याची शक्यता’
रोहित अजूनही दमदार कामगिरी करत असून तो २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत खेळण्याची शक्यता आहे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगला वाटते. ‘‘प्रत्येक खेळाडू कारकीर्दीच्या अशा टप्प्यावर येतो, जेव्हा तुम्ही कधी निवृत्त होणार याचीच लोक वाट पाहत असतात. मात्र, रोहितने स्वत:च या चर्चांना पूर्णविराम दिला. आपण देशासाठी खेळण्यास आणि नेतृत्व करण्यास उत्सुक असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील विश्वचषकात खेळण्याचे ध्येय त्याने बाळगले असावे. चॅम्पियन्स करंडकातील त्याची कामगिरी पाहता तो आणखी काही वर्षे निश्चितपणे खेळू शकतो,’’ असे पॉन्टिंग म्हणाला.