Shikhar Shakhar Give Reply To Shahid Afridi On Pahalgam Attack: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीयांनी जीव गमावले. या घटनेनंतर पुन्हा एकदा भारत–पाकिस्तानात वादाची ठिणगी पेटली आहे. पहलगाममध्ये जो हल्ला झाला, तो पाकिस्तानकडूनच केला गेला असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, पाकिस्तानच्या खेळाडूंनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. जर यात पाकिस्तानचा हात असेल, तर भारतानं पुरावे सादर करावेत, असं वक्तव्य पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं केलं होतं.
शाहिदचं भारतानं पुरावे सादर करावेत, हे वक्तव्य सध्या तुफान चर्चेत आहे. अनेक दिग्गजांनी आफ्रिदीवर टीकादेखील केली आहे. आता भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवनने शाहिद आफ्रिदीची शाळा घेतली आहे.
शिखर धवनने आपल्या एक्स अकाऊंटवरून ट्विट करीत लिहिले, “कारगिलमध्येही हरवलं होतं. आधीच खालच्या पातळीवर आहात आणखी किती खालची पातळी गाठणार? उगाच टीका करण्यापेक्षा देशाच्या प्रगतीसाठी डोकं वापरा. आम्हाला आमच्या सैन्यावर खूप अभिमान आहे. भारतमाता की जय.. जय हिंद..” ही पोस्ट शेअर करून त्यानं शाहिद आफ्रिदीला टॅग केलं आहे.
पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर शाहिद आफ्रिदीनं वक्तव्य केलं होतं. त्यानं या हल्ल्यासाठी भारतीय सैन्याला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर जर पाकिस्ताननं हा हल्ला घडवून आणला असेल, तर भारतानं पुरावे सादर करावेत, असंदेखील म्हटलं होतं. त्यासह त्यानं मीडियावरदेखील जोरदार टीका केली होती.
आफ्रिदी म्हणाला होता, “ काश्मीरमध्ये फटाके फुटले तरी तुम्ही म्हणता ते पाकिस्तानने फोडले. काश्मीरमध्ये तुमची आठ लाखांची फौज असताना इतकी मोठी घटना घडली.” शाहिद आफ्रिदीनं भारताविरोधात वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याला जेव्हा केव्हा संधी मिळते, तेव्हा तो भारतावर टीका करीत असतो. मात्र, आता त्याला शिखर धवनने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.