सध्या इंग्लंडमध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंडची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना लॉर्ट्स क्रिकेट मैदानावर काल (२ जून) सुरू झाला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, कर्णधार केन विल्यमसनचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ४० षटकांत १३२ धावांवर गारद झाला. एवढेच नाही तर इंग्लंडचे फलंदाजही विशेष काही करू शकले नाहीत. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने ३६ षटकांत सात गमावून केवळ ११६ धावा केल्या होत्या. म्हणजेच लॉर्ड्सवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी एकूण १७ गडी बाद झाले. यानंतर इंग्लिश माध्यमांनी गोलंदाजांचे तोंडभरून कौतुक केले. हे बघितल्यानंतर भारतीय कसोटी संघाचा माजी सलामीवीर वसीम जाफरने ब्रिटीश माध्यमांच्या या दुटप्पी भूमीकेवर आपल्या मिश्किल अंदाजात टीका केली आहे. यासाठी त्याने ट्विटरचा आधार घेतला.

वसीम जाफरने ट्विटरवर एक मीम शेअर केले आहे. सलमान खान आणि झरीन खानच्या ‘रेडी’ चित्रपटातील ‘कॅरेक्टर धीला’ या गाण्यातील बोल या मीमवर लिहिलेले आहेत. यासोबत वसीम जाफरने लिहिले की, ‘लॉर्ड्सवर एका दिवसात १७ बळी पडल्यानंतर गोलंदाजांच्या कौशल्याला श्रेय दिले जाते. अशीच परिस्थिती जेव्हा अहमदाबादमध्ये उद्भवली होती तेव्हा मायकेल वॉनसह इंग्लंडच्या अनेक महान क्रिकेटपटूंनी लगेच भारतीय खेळपट्टीच्या क्युरेटर्सवर टीका केली होती.’

माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर आजकाल आपल्या सोशल मीडियावरील उपस्थितीमुळे जास्त चर्चेत असतो. ट्विटरवरती तर तो विशेष सक्रिय असतो. प्रतिस्पर्धी देशांतील खेळाडूंना टोमणे मारने असो किंवा भारतीय खेळाडूंना खास आपल्या गुढ शैलीमध्ये सल्ले देणे असो दोन्हीही गोष्टी तो अगदी चोखपणे पार पाडतो. न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंडदरम्यान सुरू असलेल्या लॉर्ड्स कसोटीबाबतही त्याने ट्विट करण्याची संधी सोडली आहे. त्याने खास आपल्या शैलीमध्ये ब्रिटिश माध्यमांवर टीका केली आहे. आता त्याच्या या टीकेला जाफरचा ट्विटर शत्रू मायकेल वॉन काय प्रतिक्रिया देतो, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Story img Loader