माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर आजकाल आपल्या सोशल मीडियावरील उपस्थितीमुळे जास्त चर्चेत असतो. ट्विटर वरती तो विशेष सक्रिय असतो. प्रतिस्पर्धी देशांतील खेळाडूंना टोमणे मारने असो किंवा भारतीय खेळाडूंना खास आपल्या गुढ शैलीमध्ये सल्ले देणे असो दोन्हीही गोष्टी तो अगदी चोखपणे पार पाडतो. त्यामुळे सोशल मीडियावर तो जास्त चर्चेत असतो. मैदानाबाहेर शाब्दिक फटकेबाजी करणाऱ्या वसीम जाफरला लवकरच एक नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. जाफर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (बीसीबी) क्रीडा विकास शाखेत सामील होऊ शकतो. तिथे तो एकोणीस वर्षांखालील खेळाडूंना आणि बांगलादेश ‘हाय परफॉर्मन्स सेंटर’मध्ये मार्गदर्शन करेल.
क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या वसीम जाफरकडे प्रशिक्षण देण्याचाही चांगला अनुभव आहे. मार्च २०२० मध्ये खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर उत्तराखंडच्या मुख्य प्रशिक्षकपदी जाफरची नियुक्त करण्यात आली होती. परंतु, नंतर संघटनेशी मतभेद झाल्यानंतर त्याने राजीनामा दिला. २०१९ ते २०२१ या कालावधीत त्याने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जच्या संघाचा फलंदाजी सल्लागार म्हणूनही काम केले. अलीकडे जाफरने ओडिशाच्या वरिष्ठ पुरुष संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. जुलै २०२१ मध्ये त्याला ओडिशा क्रिकेट संघटनेने दोन वर्षांचा करार दिला होता. या कार्यकाळात राज्यातील प्रशिक्षकांच्या विकास कार्यक्रमातही त्याचा सहभाग होता.
जाफरने यापूर्वी बांगलादेश क्रिकेट मंडळासोबतही काही काळ काम केलेले आहे. २०१९ मध्ये त्याने काही महिने मीरपूर येथील बीसीबी अकादमीमध्ये फलंदाजी सल्लागार म्हणूनही काम केले होते. त्यावेळी त्याने १६ वर्षाखालील आणि १९ वर्षांखालील युवा खेळाडूंच्या दोन गटांसोबत काम केले. २०१८-१९ मध्ये तर तो अबाहानी लिमिटेड या संघाकडून ढाका प्रीमियर लीगमध्ये खेळला आहे.