India vs South Africa 1st Test Match: के.एल. राहुल गेल्या काही वर्षांत भारतासाठी सर्व फॉरमॅटमध्ये एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून उदयास आला आहे आणि म्हणूनच अनेकजण त्याला कर्णधार म्हणूनही पाहतात. अगदी अलीकडे, त्याने भारताला एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेवर २-१ने विजय मिळवून दिला आणि प्रत्येक सामन्यात संघाचे नेतृत्व केले. यादरम्यान भारताचे माजी प्रशिक्षक फलंदाज संजय मांजरेकर लोकेश राहुलच्या कॅप्टन्सीवर खूप प्रभावित झाले आहेत.
मांजरेकर म्हणाले की, “राहुलची कर्णधार म्हणून नेतृत्व करण्याची शैली ही एम.एस. धोनीसारखीच आहे.” संजय मांजरेकर यांनी ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले की, “आजकाल जेव्हा तुम्ही के.एल. राहुलला मैदानावर पाहता तेव्हा तो खूप शांत डोक्याने निर्णय घेताना दिसतो. त्याने अपेक्षेप्रमाणे कर्णधारपद सांभाळले आहे. नेतृत्वाच्या भूमिकेत त्याच्यावर कुठलाही दबाव वाटत नाही. त्याने आयपीएलमध्ये, दक्षिण आफ्रिकेतील कसोटी सामन्यात आणि एकदिवसीय सामन्यांमध्येही चांगले नेतृत्व केले आहे. तुम्ही आशा करू शकता की, के.एल. राहुल कोणतीही मोठी चूक करणार नाही. तो डीआरएसमध्ये तज्ञ आहे. राहुल हा एम.एस. धोनीच्या बरोबरीचा आहे,” असे आश्चर्यचकित करणारे विधान मांजरेकर यांनी ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना केले.
माजी खेळाडू संजय मांजरेकर पुढे म्हणाले, “भारतीय क्रिकेट ऑटोपायलट मोडवर चालत असल्याचे दिसते. सूर्यकुमार यादवने नुकतेच टी-२० मध्ये कर्णधारपद स्वीकारले आणि त्यानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली कामगिरी करत आपण नेतृत्व करण्यास सज्ज असल्याचे दाखवून दिले. आता एकदिवसीय मध्ये के.एल. राहुलने कर्णधारपद भूषवले आणि मालिका विजय मिळवत मी ही या शर्यतीत आहे, हे सांगितले. याआधी रोहित शर्मानेही भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. या यशाचे बरेच श्रेय खेळाडूंना द्यायला हवे. कर्णधारपद एक बाजूला पण त्यामुळे खेळाडूचा खेळ बदलत नाही. हे असे खेळाडू आहेत जे खरोखरच उत्तम कामगिरी करत आहेत.”
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला मंगळवारपासून (२६ डिसेंबर) सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे होणार आहे. २०२१ मध्ये या मैदानावर भारतीय संघ शेवटचा जिंकला होता, त्यावेळी विराट कोहली कर्णधार होता. आता संघाची धुरा रोहित शर्माच्या हातात आहे. टीम इंडियाला आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. तो दुष्काळ संपवण्याच्या उद्देशाने रोहितची टीम यावेळी दाखल झाली आहे.
भारतीय संघ इतिहास रचण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र त्यात पाऊस अडथळा ठरू शकतो. पहिल्या कसोटीदरम्यान हवामान खराब राहण्याची शक्यता आहे. सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे रद्द होण्याचीही शक्यता आहे. सुपरस्पोर्ट पार्कचे क्युरेटर ब्रायन ब्लॉय यांनी सांगितले की, “भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीवर पावसाचे सावट आहे. सुपरस्पोर्ट पार्कमधील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल राहील आणि फलंदाजांसाठी काही आव्हाने निर्माण करेल, अशी अपेक्षा आहे.”
भारत–दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यांची आकडेवारी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत ४२ कसोटी सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाने १५ सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेने १७ सामने जिंकले आहेत. १० सामने अनिर्णित राहिले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर टीम इंडियाचा रेकॉर्ड पाहिला तर आतापर्यंत २३ सामने खेळले गेले आहेत. भारताने केवळ चार सामने जिंकले. यजमान संघाने १२ सामने जिंकले. सात अनिर्णित राहिले आहेत.