भारताचे माजी खेळाडू आणि सध्या समालोचनाची जबाबदारी पार पाडणारे सुनिल गावसकर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा गोलंदाज जयदेव उनाडकटच्या गोलंदाजीदरम्यान मैदानात पडला होता. यावेळी समालोचनादरम्यान गावसकर यांनी उनाडकडटी खिल्ली उडवत, त्याला आयपीएलमध्ये लागलेल्या सर्वाधिक रकमेच्या बोलीवरुनही टोला लगावला होता.
“यंदा आयपीएलमध्ये जयदेवने चांगली कमाई केली आहे. कदाचीत याच कारणामुळे त्याला भारतीय संघात संधी दिली गेली असावी. पण ज्या रकेमेची बोली उनाडकटवर लागली आहे, त्या योग्यतेचा तो आहे का?” मात्र काही वेळातच आपल्या या वक्तव्यावरुन गावसकर यांनी प्रकरण सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला. “मी मस्करी करत होतो. जयदेव उनाडकट एक चांगला गोलंदाज आहे. याशिवाय फलंदाजांना चकवा देण्याचं कसबही त्याच्या गोलंदाजीत आहे.”
मात्र समालोचनादरम्यान उनाडकटच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी, बीसीसीआय गावसकरांवर कारवाई करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोणत्याही खेळाडूवर वैय्यक्तीक भाष्य करणं समालोचकांना टाळायचं असतं. याआधीही अरुण लाल, हर्षा भागले यासारख्या प्रसिद्ध समालोचकांना बीसीसीआयच्या कारवाईला सामोरं जावं लागलं होतं. जयदेवला ११.५ कोटींच्या बोलीत राजस्थान रॉयल्सच्या संघाने विकत घेतलं आहे. अकराव्या हंगामात सर्वात जास्त बोली लागलेला जयदेव पहिला भारतीय खेळाडू ठरला होता. त्यामुळे बीसीसीआय आता गावसकरांवर काय कारवाई करतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.