Harbhajan Singh has given important advice to Rohit Sharma about Hardik Pandya: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये आतापर्यंत १८ सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले, तर बांगलादेशला पराभूत केल्यानंतर आता त्यांचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी सामन्यापूर्वी टीम इंडियाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने मोठे वक्तव्य केले आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या पुढील विश्वचषक सामन्यात हार्दिकची अनुपस्थिती भरून काढण्यासाठी कर्णधार रोहित शर्माला दोन बदल करावे लागतील, असे हरभजन सिंगचे मत आहे.
भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हार्दिक पांड्यासारख्या खेळाडूची जागा इतर कोणी घेऊ शकत नाही. कारण त्याची जागा घेणे इतके सोपे नाही. भारतीय संघात नेहमीच दर्जेदार सीम-बॉलिंग अष्टपैलू खेळाडूंचा अभाव असतो. भारताच्या विश्वचषक संघात मिचेल मार्श मार्कस स्टॉइनिस आणि कॅमेरून ग्रीन सारख्या खेळाडूंची कमतरता आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याला काय झाले, तर त्याची जागा कोणी घेऊ शकत नाही. जसे आता हार्दिक पांड्याला दुखापत झाली आहे. टीम इंडियाकडे हार्दिक पांड्याचा पर्यायी खेळाडू उपलब्ध नाही.
बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या घोट्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे रविवारी धर्मशाला येथे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याला त्याला मुकावे लागणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिकला फक्त तीन चेंडू टाकता आले आणि एक चेंडू थांबवताना तो जखमी झाला. दुखापत झाल्यानंतर त्याला खूप वेदना होत असल्याचे दिसून आले आणि त्याला लगेच मैदान सोडावे लागले.
बीसीसीआयने नंतर सांगितले की, तो संघासह धर्मशालाला जाणार नाही. त्याऐवजी तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली थेट बंगळुरूमधील एनसीएमध्ये जाईल. तथापि, चांगली गोष्ट अशी आहे की स्कॅनमध्ये कोणत्याही मोठ्या दुखापतीची पुष्टी झालेली नाही. त्यामुळे २९ तारखेला लखनऊमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो परत येईल, अशी भारतीय संघ व्यवस्थापनाला आशा आहे.
हरभजन सिंगने रोहित शर्माला दिला महत्त्वाचा सल्ला
आजतकच्या शोमधील संभाषणादरम्यान हरभजन सिंग म्हणाला, “जर हार्दिक पांड्या फिट नसेल, तर भारतासाठी मोठी समस्या आहे. तो आमचे संयोजन सेट करतो आणि जर तो खेळला नाही तर तुम्हाला ते बदलावे लागेल. तुम्ही इशान किशन किंवा सूर्यकुमार यादव यापैकी एकाला विशेषज्ञ फलंदाज म्हणून खेळवू शकता. मात्र शार्दुल ठाकूरच्या जागी शमीला खेळवावे. तो आपल्यासाठी १० षटके गोलंदाजी करु शकतो.”
रोहितने हरभजनच्या सल्ल्याचे पालन करून शार्दुलच्या जागी शमीची आणि हार्दिकच्या जागी सूर्यकुमारची निवड केल्यास टीम इंडियाची फलंदाजी मजबूत असेल पण फक्त सात व्या क्रमांकापर्यंत. मात्र, शमी, बुमराह, कुलदीप आणि सिराज यांच्यामुळे टीम इंडियाची खालची फळी खूपच कमकुवत होईल.