Former Indian team captain MS Dhoni Today is the 42nd Birthday: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज (७ जुलै) वाढदिवस आहे. आता तो ४२ वर्षाचा झाला आहे. भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्याचे सर्व श्रेय धोनीला जाते. २००७ साली तत्कालीन कर्णधार राहुल द्रविडने राजीनामा दिल्याने कर्णधारपदाची माळ धोनीच्या गळ्यात पडली. त्यानंतर धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारताने २००७ सालच्यापहिल्या टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. ही फक्त सुरुवात होती ज्यानंतर एमएस धोनीने मागे वळून पाहिले नाही. माहीच्या ४२ व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या कारकिर्दीतील पाच खास कामगिरी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार (मर्यादित षटकांतील) –

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २००७ मध्ये टी-२० विश्वचषक, २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. मर्यादित षटकांतील क्रिकेटमध्ये ही तिन्ही आयसीसी विजेतेपदे जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली २४ वर्षांनी २००७ मध्ये भारतात वर्ल्ड कप आला होता. इतकंच नाही तर टीम इंडिया २८ वर्षांनंतर वनडे चॅम्पियन देखील बनली आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडियाची ही सर्वात मोठी कामगिरी होती.

सर्वाधिक एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार –

सर्वाधिक एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे कर्णधार बनण्याचा विक्रमही एमएस धोनीच्या नावावर आहे. त्याने २०० एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने ११० सामने जिंकले असून ७४ गमावले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून माहीने टीम इंडियाला एका नव्या उंचीवर पोहोचवले.

हेही वाचा – Mohammad Shami: सुप्रीम कोर्टाचा मोहम्मद शमीला मोठा झटका, चार वर्षे जुन्या प्रकरणाची पुन्हा होणार सुनावणी

कर्णधारपदासोबतच फलंदाजीतही शानदार कामगिरी –

एमएस धोनीने आपल्या कर्णधारपदासह फलंदाजीतही खूप नाव कमावले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर अवघ्या ४२ डावांत तो एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला होता. सर्वात कमी डावात एकदिवसीय क्रिकेटमध्ये नंबर वन फलंदाज बनण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. २००५ मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध १८३ धावा केल्या होत्या. त्याच्या नावावर १०७७३ एकदिवसीय आणि ४८७६ कसोटी धावा आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये संघ नंबर वन बनला –

भारताने २००७ साली टी-२० विश्वचषक विजेतेपद पटकावल्यानंतर कसोटीतही दमदार प्रदर्शन केले. २००८ मध्ये एमएस धोनी कसोटी संघाचा कर्णधार झाला. त्यानंतर २००९ साली टीम इंडिया टेस्ट क्रिकेटमध्ये नंबर वन टीम बनली. कसोटी क्रिकेटमध्येही त्यांच्या नेतृत्वाखाली संघाला परदेशी भूमीवर जिंकण्याची सवय लागली होती. त्यामुळे भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये नंबर वन बनला.

आशिया कपमध्येही भारतीय संघ दोनदा चॅम्पियन ठरला –

एक कर्णधार म्हणून जिथे धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राज्य केले. त्याचवेळी आशिया खंडातही त्यांचा दबदबा होता. धोनीच्या नेतृत्वाखाली, संघाने दोन वेळा आशिया कप जिंकण्याबरोबरच दोन विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०१० आणि २०१६ मध्ये आशिया कप ट्रॉफी जिंकली होती.

हेही वाचा – मेहेंदी है रचने…; सुंदर वधूला न्यायला घोड्यावर बसून शाही थाटात पोहोचला हॅरिस रौफ, रंगारंग मेजवानीचा पाहा Video

एमएस धोनीने आपल्या १५-१६ वर्षांच्या कारकिर्दीत बरेच काही केले, ज्यानंतर त्याचे नाव आज भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून घेतले जाते. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला पाच वेळा चॅम्पियन बनवले. २०१९ विश्वचषक उपांत्य फेरीतील पराभवानंतर धोनी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला नाही. १५ ऑगस्ट २०२० रोजी संध्याकाळी अचानकपणे आपल्या शैलीत धोनीने निवृत्तीची घोषणा करून सर्वांना चकित केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former indian team captain ms dhoni today is the 42nd birthday and lets know about his achievements vbm