माजी आंतरराष्ट्रीय अम्पायर पिलू रिपोर्टर यांचं रविवारी निधन झालं. त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पिलू रिपोर्टर यांनी आपल्या दीर्घ आणि गौरवशाली २८ वर्षांच्या कारकिर्दीत १४ कसोटी आणि २२ एकदिवसीय सामन्यांमध्ये अम्पायर म्हणून जबाबदारी पार पाडली. १९८६ मध्ये पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिजच्या मालिकेत इम्रान खान यांनी पिलू रिपोर्टर यांना भारतीय अम्पायर व्ही के रामास्वामी यांच्याबरोबर अम्पायरिंग करण्यासाठी निमंत्रित केलं होतं.
९० च्या दशकात जगातील तटस्थ पंचांची जोडी म्हणून पिलू रिपोर्टर आणि व्ही के रामास्वामी यांच्याकडे पाहिलं जात होतं. पिलू रिपोर्टर यांनी १९९२ च्या विश्वचषकातही अम्पायरिंग केलं होतं.
अम्पायरिंग करण्यापूर्वी पिलू रिपोर्टर हे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात नोकरीला होते. त्यावेळी बॉम्बे क्रिकेट असोसिएशनने नवीन अम्पायरची जागा भरण्यासाठी एक जाहिरात दिली. त्यावेळेस ते चाचणीत अयशस्वी झाले. पण काही काळानंतर, ते स्थानिक सामन्यांमध्ये अम्पायरिंग करताना दिसले. अखेरीस, त्यांना रणजी ट्रॉफीमध्ये अम्पायर म्हणून नियुक्त करण्यात आले आणि पुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली.