‘एसजेएएम’च्या चर्चासत्रात महाराष्ट्राच्या माजी खेळाडूंचा एकच नारा

मुंबई : सरकारदरबारी असलेली अनास्था.. क्रीडा धोरण राबवूनही आलेले अपयश.. राज्य क्रीडा संघटनांमधील मतभेद.. क्रीडा मंत्रालयाकडून राज्य क्रीडा संघटनांना मिळणारी तुटपुंजी मदत.. यामुळे क्रीडाक्षेत्रात एकेकाळी वरचढ असलेल्या महाराष्ट्राची आता पीछेहाट होत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर महाराष्ट्रातून पदकविजेते खेळाडू तयार होणारच नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातून ऑलिम्पिक पदकविजेते खेळाडू घडवायचे असल्यास, राज्याच्या कानाकोपऱ्यात क्रीडासंस्कृती रुजविणे आवश्यक आहे, असा एकच सूर एसजेएएमच्या चर्चासत्रात दिग्गज खेळाडू आणि प्रशिक्षकांतर्फे उमटला. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदील सुमारीवाला, ऑलिम्पियन नेमबाज-प्रशिक्षक दीपाली देशपांडे, माजी कुस्तीपटू आणि प्रशिक्षक काका पवार तसेच भारतीय बॉक्सिंग महासंघाचे महासचिव जय कवळी यांनी स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ मुंबईच्या या चर्चासत्रात महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या सद्य क्रीडा परिस्थितीबाबत कठोर शब्दांत ताशेरे ओढले.

महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन आणि क्रीडा मंत्रालय सध्या निद्रावस्थेत आहे. राज्यासाठी काही वर्षांपूर्वी क्रीडा धोरण राबविण्यात आले, पण त्याचे पुढे काहीच झाले नाही. महाराष्ट्रात सध्या घाणेरडे राजकारण सुरू असून जिल्हा अधिकारी आणि जिल्हा पातळीवरील प्रशिक्षक आता राज्य संघटनांवर आले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत अ‍ॅथलिट्सनी सुरेख कामगिरी केली. अरब देशांकडून जर आफ्रिकन खेळाडू खेळले नसते तर भारताच्या पदकांची संख्या जास्त असती. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने आता २०२० आणि २०२४ ऑलिम्पिकसाठी स्पर्धाचा आराखडा तयार केला असून त्यानुसारच खेळाडूंना सहभागी करून घेतले जाईल.

– आदील सुमारीवाला, ११ वेळा राष्ट्रीय विजेता धावपटू

एकेकाळी महाराष्ट्राच्या तीन खेळाडू ऑलिम्पिकसाठी जात होत्या. आता ती संख्या कमी होत चालली आहे. महाराष्ट्र सरकारकडून आम्हाला कोणतीही मदत मिळत नाही. वेळप्रसंगी खेळाडूंना स्वत:चे पैसे खर्च करून स्पर्धासाठी जावे लागते. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये शूटिंग रेंजच्या प्रशिक्षणासाठी मी अर्ज केला. पण सरकारच्या नियमानुसार मी प्रशिक्षण देण्यासाठी अपात्र ठरले. त्यामुळे राज्यातील खेळाडूंचे भवितव्य काय असेल, याची कल्पना तुम्हाला आली असेल. 

– दीपाली देशपांडे, माजी ऑलिम्पियन नेमबाज

२०२० ऑलिम्पिकसाठी पदकाचे उद्दिष्ट ठेवून सरकारने राज्यातील अव्वल कुस्तीपटूंची निवड केली. त्यांना दोन वर्षांपूर्वी तयारीसाठी पैसे देण्यात येणार होते. ते पैसे आता देण्यात येत आहेत. १९८२ मध्ये चीन आपल्या मागे होता. त्यांनी खेळाडू शोधून काढून त्यांना घडवले. आता देशाचा क्रीडामंत्री हा खेळाडू आहे. त्यामुळे खेळाडूंना सरावासाठी, प्रशिक्षणासाठी जास्त पैसे मिळतील, अशी अपेक्षा आहे. तसे झाल्यास, भारताला आणखीन सुवर्णपदके मिळू शकतील.

– काका पवार, कुस्ती प्रशिक्षक

भारतानंतर चीनला स्वातंत्र्य मिळाले. १९६८ पर्यंत भारताची ऑलिम्पिकमधील कामगिरी चांगली होत होती. त्यानंतर ती ढासळत गेली. १९८४ ऑलिम्पिकमध्ये चीन पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला. भारताला जे करता आले नाही ते चीनने करून दाखवले. पुढील १०० वर्षांतही आपण चीनशी बरोबरी करू शकणार नाही. खेलो इंडियाचे बजेट हे ४१५ कोटींचे होते. अनेक आफ्रिकन देशांचा संपूर्ण अर्थसंकल्पही तेवढा नसतो. पण तरीही ते भारतापेक्षा जास्त पदके मिळवतात. खेलो इंडियाच्या धर्तीवर आता खेलो महाराष्ट्र स्पर्धा सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये बॉक्सिंग खेळाचा समावेश करण्यात आलेला नाही. आम्ही फक्त ऑलिम्पिक खेळांनाच स्थान दिले आहे, हे सरकारचे उत्तर आहे.

– जय कवळी, भारतीय बॉक्सिंग संघटनेचे महासचिव