पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कसोटीपटू तन्वीर अहमद याने आपल्याच संघातील काही खेळाडूंवर टीकेची झोड उठवली आहे. पाकिस्तानचे काही खेळाडू हे पाक क्रिकेट बोर्डात काम करण्यासाठी इतके उत्सुक आहेत, की बोर्डाने त्यांना नोकरी दिली तर शौचालयातही काम करायला मागेपुढे पाहणार नाहीत. GTV वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तन्वीर अहमद बोलत होता.
“पाकिस्तानचे माजी खेळाडू क्रिकेट बोर्डात काम करण्यासाठी इतके उत्सुक आहेत की त्यांना शौचालय साफ करण्याची संधी मिळाली तर ते कामही ते करतील. हे माझं वैय्यक्तिक मत आहे, आणि यात काही चूक आहे असं मला वाटत नाही.” तन्वीर अहमदने आपल्या मुलाखतीत पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि निवड समितीप्रमुख इंझमाम उल-हक याला आपल्या टिकेचं लक्ष्य बनवलं. इंझमाने आतापर्यंत संघ निवड करताना नेहमी घराणेशाही दाखवलेली आहे. निवड समिती प्रमुख म्हणून त्याने केलेलं एक चांगलं काम मला सांगा, माझ्या दृष्टीने तो महान खेळाडू नाहीये, अहमद बोलत होता.
2010-2013 या काळात तन्वीर अहमदने पाकिस्तानकडून 5 कसोटी, एक टी-20 आणि 2 वन-डे सामने खेळले आहेत. त्याच्या मुलाखतीनंतर पाकिस्तानी चाहत्यांनी त्याच्यावर चांगलचं तोंडसुख घेतलं आहे. त्याच्या या मुलाखतीला पाकिस्तानात सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. याआधीही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला तन्वीर अहमदने डिवचलं होतं.