भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज विराट कोहली सध्या वाईट फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच संपलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये तर तो धावांसाठी कमालीचा झगडताना दिसला. आयपीएलच्या क्वॉलिफायर २ सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली अवघ्या सात धावांवर बाद झाला होता. महत्त्वाच्या सामन्यात त्याचे अशा प्रकारे बाद होणे संपूर्ण संघासाठी मारक ठरले आणि बंगळुरूचा संघा स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. त्यानंतर विराट कोहलीवर जोरदार टीका सुरू झाली आहे. विरेंद्र सेहवागसारख्या दिग्गज माजी भारतीय खेळाडूंनी तर जाहीरपणे कोहलीवर नाराजी व्यक्त केली आहे. अशा स्थितीमध्ये एका दिग्गज माजी पाकिस्तानी खेळाडूने विराट कोहलीची पाठराखण केली आहे.
विराट कोहली आपल्या वेगवान आणि स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात कुशल आणि धोकादायक खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होतो. मात्र, गेल्या काही काळापासून ‘रनमशीन’ विराटची बॅट अतिशय शांत पडली आहे. जवळपास गेल्या अडीच वर्षांच्या काळात विराटच्या बॅटमधून एकही शतकी खेळी झालेली नाही. एकेकाळी विराट सचिन तेंडुलकरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १०० शतकांचा विक्रम सहज मोडेल, असे मानले जात होते. त्याचा सध्याचा फॉर्म बघता ही गोष्ट सर्वांना कठीण वाटत आहे. पण, ‘विराट कोहली आपल्या कार्यकाळात १०० नव्हे तर ११० शतके झळकावेल, असा विश्वास पाकिस्तान संघातील माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केला आहे.
क्रिकेटमधील सर्वात घातक गोलंदांजांपैकी एक असलेल्या शोएब अख्तरने विराट कोहलीची पाठराखण करत त्याला प्रोत्साहन दिले आहे. स्पोर्ट्सकीडा या क्रीडा वेबसाइटशी संवाद साधताना शोएब अख्तरने जाहीरपणे विराट कोहलीला पाठींबा दिला आहे. तो म्हणाला, “तुम्ही विराट कोहलीचा आदर का करत नाही? त्याच्याबद्दल चांगल्या गोष्टी बोला आणि त्याला आदर द्या. एक पाकिस्तानी असूनही मी म्हणेन की तो क्रिकेटच्या इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११० शतके ठोकेल, याबाबत मी पैज लावू शकतो.”
काही दिवसांपूर्वी विरेंद्र सेहवाग व्यतिरिक्त माजी खेळाडू असलेल्या संजय मांजरेकरनेही विराट कोहलीच्या खेळावर टीका केली आहे. एवढेच नाही तर भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक असलेल्या रवी शास्त्रींनीदेखील विराट कोहलीला काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करण्याचा मोठा दबाब विराट कोहलीवर आहे.
विराटने आपल्या टीकाकारांवर लक्ष देऊ नये असा सल्ला शोएब अख्तरने दिला आहे. ‘विराटने कोणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. त्याला वयाच्या ४५व्या वर्षापर्यंत खेळायचे आहे. सध्याची परिस्थिती तुम्हाला त्याला ११० शतके झळकावण्यासाठी मजबूत बनवत आहे. लोक त्याच्याबद्दल वाईट बोलत आहेत. त्याच्या पत्नी आणि मुलीविरोधातही वाईट ट्विट केले जात आहे. एका खेळाडूसाठी यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. मात्र, ही सर्व परिस्थिती त्याला ११० शतके करण्यासाठी तयार करत आहे,’ असे अख्तर म्हणाला आहे.