Mickey Arthur Grant Bradburn and Andrew Puttick resign from NCA positions : मिकी आर्थर, ग्रँट ब्रॅडबर्न आणि अँड्र्यू पुटिक यांनी एनसीएमधील आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. एप्रिल २०२३ मध्ये मिकी आर्थरची पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर, ब्रॅडबर्न यांना गेल्या वर्षीच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या राष्ट्रीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषित करण्यात आले होते. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू पुटिक हे एप्रिल २०२३ पासून पाकिस्तानचे फलंदाजी प्रशिक्षक होते. मिकी आर्थर, ग्रँट ब्रॅडबर्न आणि अँड्र्यू पुटिक यांना नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये बदल केल्यानंतर लाहोरस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) चा प्रभार देण्यात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिकी आर्थर २०१६ पासून पाकिस्तान क्रिकेटशी जोडले होते –

त्याच्या अलीकडील कार्यकाळापूर्वी, मिकी आर्थर २०१६ ते २०१९ पर्यंत पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यादरम्यान, पाकिस्तानने आयसीसी कसोटी संघ क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवला होता. त्याचबरोबर २०१७ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिकी आर्थरने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.

ब्रॅडबर्न हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकही राहिले होते –

५७ वर्षीय ग्रँट ब्रॅडबर्न यांनी १९९० ते २००१ या कालावधीत १८ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले. त्यांना पाकिस्तान क्रिकेटने एनसीएमधील उच्च-कार्यक्षमता कोचिंगच्या प्रमुखाची जबाबदारी दिली होती. याआधी ते २०१८ ते २०२० पर्यंत पाकिस्तान पुरुष संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते. ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांनी मुख्य प्रशिक्षकाची भूमिकाही निभावली होती.

हेही वाचा – IND vs UZB : भारताने गमावला सलग दुसरा सामना, उझबेकिस्तानकडून पराभव झाल्याने बाद फेरीत पोहोचणे कठीण

पाकिस्तान संघाच्या लाजिरवाण्या कामगिरीमुळे दिले राजीनामे –

पाकिस्तान क्रिकेटमधील या बदलामागील कारण सांगण्यात आलेले नाही, मात्र संघाच्या लाजिरवाण्या कामगिरीमुळे हे राजीनामे झाल्याचे मानले जात आहे. पाकिस्तान संघ न्यूझीलंडमध्ये पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळत आहे, ज्यामध्ये पाकिस्तानने पहिले तीन सामने गमावले आहेत आणि मालिकाही गमावली आहे. याआधी पाकिस्तानी संघाला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागला होता. टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाची ही लाजिरवाणी कामगिरी पीसीबीची चिंता वाढवत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former pakistan coaches mickey arthur grant bradburn and andrew puttick resign from nca positions vbm