भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज विराट कोहली सध्या वाईट फॉर्ममध्ये आहे. साधारण महिन्यापूर्वी पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये तर तो धावांसाठी कमालीचा झगडताना दिसला. विशेष म्हणजे गेल्या अडीच वर्षांच्या काळात त्याच्या बॅटमधून एक शतक निघालेले नाही. एकूणच विराट कोहली खरोखर आपल्या कारकीर्दीतील वाईट काळातून जात आहे. याबाबत जागतिक क्रिकेटमधील अनेक माजी खेळाडूंनी आपापली मते व्यक्त केली आहेत. यामध्ये आता पाकिस्तानचे माजी कर्णधार राशिद लतीफ यांचाही समावेश झाला आहे. लतीफ यांनी कोहलीच्या खराब फॉर्मसाठी माजी भारतीय प्रशिक्षकाला जबाबदार धरले आहे.
‘कॉट बिहाईंड’ या स्पोर्ट्स युट्युब चॅलेनशी बोलताना राशिद लतीफ यांनी भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या कार्यक्षमतेवर जोरदार टीका केली आहे. ‘विराट कोहलीने काही दिवस क्रिकेटमधून सुट्टी घ्यावी,’ असा सल्ला काही दिवसांपूर्वी शास्त्रींनी दिला होता. या मुद्द्याला धरून राशिद लतीफ यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना लतीफ यांनी रवी शास्त्रींवर गंभीर आरोप लावले. लतीफ यांच्या म्हणण्यानुसार, विराट कोहलीच्या खराब फॉर्मसाठी स्वत: शास्त्रीच जबाबदार आहेत.
हेही वाचा – कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानावर असलेला खेळाडू म्हणतो, ‘मला क्रिकेट आवडत नाही…!’
राशिद लतीफ पुढे म्हणाले, “२०१७ मध्ये कुंबळेसारख्या खेळाडूला बाजूला करून रवी शास्त्रीकडे प्रशिक्षकपद दिले. रवी शास्त्री प्रत्यक्षात एक ब्रॉडकास्टर होते. त्यांचा प्रशिक्षणाशी काहीही संबंध नव्हता. शास्त्रीला आणण्यात विराट कोहलीशिवाय इतरांचीही भूमिका असेल. पण, यामुळे त्यांचेच नुकसान झाले. शास्त्री प्रशिक्षक नसते तर कोहली कधीच फॉर्मबाहेर गेला नसता.”
रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाला चांगले यश मिळाले होते. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये ऐतिहासिक विजयांची नोंद केली होती. या सर्व कामगिरीनंतरही कुंबळेच्या जागी शास्त्रींना प्रशिक्षक म्हणून नियुक्त केल्याने भारतीय संघाचे नुकसान झाल्याचे राशिद लतीफ यांना वाटते.