पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी पाक सरकारची बाजू मांडली. कोणताही ठोस पुरावा हाती नसताना भारत पाकिस्तानवर आरोप करत असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलं. आपल्या नेतृत्वाखालील नवीन पाकिस्तानात दहशतवादाला थारा नसून, भारताने पुरावे दिल्यास आपलं सरकार चौकशी करेल असंही आश्वासन खान यांनी दिलं. याचसोबत मात्र भारताकडून युद्धाची भाषा केली गेली तर त्याला पाकिस्तानही सडेतोड प्रत्युत्तर देईल, असं म्हणत खान यांनी भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला.
खान यांनी दिलेल्या प्रतिक्रीयेवर भारतात सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली गेली. मात्र पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनेही इम्रान खान यांना पाठींबा देत, तुम्ही दिलेलं प्रत्युत्तर एकदम योग्य असल्याचं म्हटलं आहे.
Absolutely crystal&Clear https://t.co/AUc79pHvfO
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) February 19, 2019
दरम्यान, या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले आणि त्यानंतर पाकिस्तानशी सर्व संबंध तोडण्याचे कार्य सुरू झाले. देशवासीयांप्रमाणे सेलेब्रिटीनींही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आगामी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी जोर धरत आहे. भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग यानेही पाकविरुद्ध खेळू नका अशी मागणी केली आहे. देश महत्त्वाचा आहे, क्रिकेट नंतर, असे मत भज्जीनं व्यक्त केलं आहे.
अवश्य वाचा – हिंदू धर्मग्रंथ वाचून शांतता मिळते, अमेरिकन ऑलिम्पियनपटूने दिली कौतुकाची पावती