पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागवर टीका केली आहे. तीन वर्ष जुन्या व्हिडीओसंबंधी बोलताना शोएब अख्तरने सेहवागच्या डोक्यावर जेवढे केस नाहीत तेवढे माझ्याकडे पैसे आहेत असं म्हटलं आहे. “एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ माझा मित्र सेहवागचा आहे. त्याने शोएब अख्तर पैशांसाठी भारताची स्तुती करतो असं म्हटलं आहे,” असं शोएब व्हिडीओत सांगताना दिसत आहे.

सेहवागच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शोएबने म्हटलं आहे की, “संपत्ती अल्लाह देतो भारत नाही. जेवढे सेहवागच्या डोक्यावर केस नाहीत, तेवढे माझ्याकडे पैसे आहेत”. यानंतर शोएबने लगेचच ही मस्करी असल्याचं स्पष्ट केलं. “मी मिश्कील पद्धतीने हे बोलत आहे. कृपया हा एक जोक म्हणूनच घ्या,” असंही यावेळी शोएबने सांगितलं.

२०१६ मध्ये एका चॅट शोमध्ये बोलताना सेहवागने म्हटलं होतं की, “शोएब अख्तर आमचा चांगला मित्र झाला असून, भारतात व्यवसाय सुरु करायचा असल्याने तो भारताचं कौतुक करत असतो. तुम्ही त्याच्या मुलाखती पाहिल्यात तर लक्षात येईल की, भारताबद्दल तो इतक्या चांगल्या गोष्टी बोलत आहे ज्या त्याने कधी पाकिस्तानकडून खेळत असताना बोलल्या नव्हत्या”.

Story img Loader