भारताचा माजी यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी हा आतापर्यंतचा महान कर्णधार म्हणून ओळखला जातो. एकदिवसीय विश्वचषक, टी २० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा धोनी क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव कर्णधार आहे. कर्णधारपदाबरोबरच त्याच्या यष्टीरक्षण कौशल्याचेही अनेक चाहते आहे. यष्टीमागे उभे राहून त्याने आतापर्यंत शेकडो फलंदाजांना बाद केले आहे. परंतु, पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफ धोनीला चांगला यष्टीरक्षक मानत नाही, लतीफने धोनीच्या यष्टीरक्षण कौशल्यांमध्ये कमतरता होती, असा दावा केला आहे.
राशिद लतीफ स्वतः एक यष्टिरक्षक फलंदाज राहिला होता. त्याच्या मते, यष्टीरक्षक म्हणून धोनीची आकडेवारी दर्शवते की त्याची झेल सोडण्याची टक्केवारी खूप जास्त आहे. लतीफने आपल्या अधिकृत युट्यूब चॅनल ‘कॉटबिहाइंड’वर धोनीबद्दल वक्तव्य केले आहे. तो म्हणाला, “धोनी एक यष्टीरक्षक फलंदाज होता. धोनीचं नाव मोठं आहे. पण, जर त्याची आकडेवारी बघितली तर झेल सोडण्याची त्याची टक्केवारी २१ टक्के आहे. हे प्रमाण खूप जास्त आहे”.
पाकिस्तान क्रिकेट संघाचे नेतृत्व करणारा राशिद लतीफ म्हणाला की, यष्टिरक्षकाचे यश मोजण्याची आकडेवारी खूप नंतर आली आहे. तुम्ही माझे रेकॉर्ड वापरू शकत नाही. कारण, २००२ ते २००३ पासून यष्टीरक्षकाची कामगिरी मोजण्याचे तंत्र अस्तित्वात आले आहे. मी त्यापूर्वीच खेळलो होतो. धोनीच्या तुलने अॅडम गिलख्रिस्टची टक्केवारी फक्त ११ होती. मार्क बाउचरही खूप चांगला होता. ऑस्ट्रेलियाच्या टीम पेननेही सुरुवात चांगली केली. पण, शेवटी त्याने बरेच झेल सोडले.
राशिद लतीफच्या मते, गेल्या १५ वर्षांच्या काळात यष्टीरक्षक म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकची कामगिरी विलक्षण आहे. त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये चांगले यष्टीरक्षण केले आहे.