पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला करोनाची लागण झाली आहे. आमिरने स्वत: ट्वीट करून माहिती दिली. चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे अबुधाबी येथे होणाऱ्या आगामी टी-१० लीगमध्ये तो भाग घेऊ शकणार नाही. आमिरने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, परंतु पाकिस्तान संघाचे व्यवस्थापन बदलल्यानंतर त्याने पुन्हा पुनरागमनासाठी होकार दिला आहे.

मोहम्मद आमिर अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे तो जगभरात चालणाऱ्या विविध फॉरमॅटच्या लीगमध्ये सहभागी होत आहे. सप्टेंबरमध्ये संपलेल्या कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये त्याने भाग घेतला, ज्यामध्ये त्याची कामगिरी सरासरी होती. आता तो उद्यापासून सुरू होणाऱ्या टी-१० लीगमध्ये भाग घेणार होता, पण करोनामुळे तो या मोठ्या स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही.

हेही वाचा – रोहितचा १५ वर्षापूर्वीचा लूक व्हायरल; दीपक चहरनं शेअर केला फोटो; म्हणाला, ‘‘त्यावेळी आम्हाला दाढी नव्हती!”

मोहम्मद आमिरने ट्वीटमध्ये म्हटले, ”माझा सर्वांना नमस्कार! मी या वर्षी टी-१० लीग खेळणार नाही, एवढेच सांगायचे होते. कारण मला करोनाची लागण झाली आहे. पण आता मी ठीक आहे. लवकर बरे होण्यासाठी तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांची गरज आहे.”

टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पराभव केल्यामुळे पाकिस्तानी चाहते आणि खेळाडूंनी जल्लोष करायला सुरुवात केली. मात्र याचदरम्यान मोहम्मद आमिरने ट्विटरवर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगवर कमेंट केल्याने दोन्ही खेळाडूंमधील वाद वाढला. हे दोन्ही खेळाडू ट्विटरवर एकमेकांविरोधात खूप बोलले होते.