Saeed Ajmal’s Big Allegation On MS Dhoni: पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सईद अजमलने आता धोनीबाबत अजब विधान केले आहे. अजमल एकेकाळी पाकिस्तान संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून ओळखला जायचा, पण एकदिवसीय प्रकारात त्याला एकदाही सामनावीराचा किताब पटकावता आलेला नाही. आता अजमलने भारताविरुद्धच्या सामन्यात स्वतःला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चे हक्कदार घोषित करताना धोनीवर आरोप केला आहे.त्याने सांगितले की, धोनीने त्या सामन्यात दोन झेल सोडले होते, तरी त्याला सामनावीराच किताब दिला होता.
२०१२ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली होती. या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून पाकिस्तानने मालिकेत अभेद्य आघाडी घेतली होती. यानंतर, शेवटच्या वनडेबद्दल नादिर अलीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना अजमलने स्वतःबद्दल आणि धोनीबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे.
सईद अजमल म्हणाला की, “मला वाटते की माझे नशीब खराब होते. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला १७५ धावांवर रोखण्यात मी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या सामन्यात मी पाच विकेट घेतल्या होत्या. त्याचवेळी धोनीने केवळ १८ धावा करण्यासोबतच सामन्यात दोन झेलही सोडले होते. यानंतरही त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्याला हा पुरस्कार द्यायला हवा, असे मला वाटते. हा सामना भारताने जिंकला पण झेल सोडल्यानंतरही धोनीला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब देण्यात आला होता.”
हेही वाचा – VIDEO: मिचेल स्टार्कने घेतलेल्या झेलवरून निर्माण झाला वाद, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
अजमल ‘सामनावीर’च्या पुरस्कार दूर –
अजमल हा जगातील नंबर १ वनडे आणि टी-२० गोलंदाज राहिला आहे. मात्र, त्याला कधीही सामनावीराचा किताब जिंकता आला नाही. त्याचवेळी त्याने धोनीवर केलेले आरोपही चुकीचे आहेत. त्याने ५ विकेट घेतल्या, पण त्या सामन्यात धोनीने सर्वाधिक धावा केल्या. विजयी संघाकडून त्याने ३६ धावा केल्या आणि यादरम्यान त्याने एक चौकार आणि तीन षटकारही मारले होते. अजमलने आणखी एक गोष्ट चुकीची सांगितली आहे. त्या सामन्यात टीम इंडिया १६७ धावांवर ऑलआऊट झाली होती. त्याचबरोबर धोनीला एकच झेल पकडता आला नव्हता. याशिवाय अजमल स्वत:ही धोनीच्या झेलमुळे बाद झाला आणि अकमललाही धोनीने बाद केले.
हेही वाचा – ENG vs AUS: दुखापतग्रस्त असताना फलंदाजीला आलेल्या नॅथन लायनच्या धैर्याला सर्वांनी केला सलाम, पाहा VIDEO
धोनीने एकदिवसीय कारकिर्दीत २१ वेळा सामनावीराचा किताब जिंकला –
महेंद्रसिंग धोनीची गणना जागतिक क्रिकेटमधील यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. धोनीने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत ३५० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने बॅटने १० हजारांहून अधिक धावा केल्या, तर त्याने ३२१ झेल आणि १२३ यष्टीमागे स्टंपिंग केले. तथापि, भारताला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार धोनी त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत केवळ 21 वेळा सामनावीराचा किताब जिंकू शकला. यामध्ये २०१२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या द्विपक्षीय मालिकेतील एका सामन्याचा समावेश आहे.