संपूर्ण देशभरात सोमवारी होळीचा सण साजरा करण्यात आला. करोनाच्या संकटातही अनेक ठिकाणी लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत होळी साजरी केली. भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून होळीच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान पाकिस्तानचा क्रिकेटपटू वसीम अक्रमनेही एक खास फोटो शेअर करत होळीच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे, हा फोटो 34 वर्ष जुना आहे.

क्रीडा सादरकर्ते गौतम भिमानी यांनी हा फोटो आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला. भारत आणि पाकिस्तान संघाने एकाच पूलमध्ये होळी साजरी केली होती. या फोटोत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम असून भिमानी यांनी फोटोला ”माझ्या आवडत्या क्रिकेट होळीची आठवण”, असे कॅप्शन दिले आहे.

वसीम अक्रमनेही भिमानी यांची ही पोस्ट रिट्विट करत चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ”होळीच्या शुभेच्छा. काय दिवस होते ते. 1987चा भारत दौरा”, असे अक्रमने शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

 

1987मध्ये पाकिस्तानी संघ इम्रान खानच्या नेतृत्वात भारत दौर्‍यावर होता. या दोन संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका आणि सहा सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. त्यावेळी वसीम अक्रमदेखील पाकिस्तान संघाचा एक भाग होता. त्यावेळी तो अवघ्या 20 वर्षाचा होता.

पाकिस्तान क्रिकेटमधील एक महान खेळाडू म्हणून वसीम अक्रमचे नाव घेतले जाते. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 6615 धावा केल्या आणि एकूण 916 बळी घेतले.