Javed Miandad has strongly criticized the decision to remove Babar Azam from the captaincy : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी खूपच निराशाजनक होती. त्यामुळेच या महत्त्वाच्या स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये संघाला स्थान मिळवता आले नाही. यानंतर बाबर आझमच्या कर्णधारपदावरही अनेकांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर बाबरला कर्णधार पद सोडावे लागले. बाबर आझमला कर्णधारपदावरून हटवण्याच्या निर्णयावर पाकिस्तानचे माजी खेळाडू जावेद मियांदादने जोरदार टीका केली आहे. त्याच्या मते, ज्या लोकांना क्रिकेट समजत नाही त्यांनी बाबर आझमला पाकिस्तानच्या कर्णधारपदावरून हटवले आहे.
१५ नोव्हेंबर रोजी बाबर आझमने पाकिस्तान संघाच्या तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यानंतर पीसीबीने शान मसूदची कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली, तर वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीकडे टी-२० संघाची कमान सोपवण्यात आली आहे. वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत कुणालाही कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. १४ डिसेंबरपासून ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. ही कसोटी मालिका ऑस्ट्रेलियात खेळवली जाणार आहे.
कराचीतील स्थानिक मीडियाशी बोलताना जावेद मियांदाद म्हणाला, “ज्या लोकांना क्रिकेट समजत नाही त्यांनी बाबर आझमला कर्णधारपदावरून हटवले आहे. प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यात वयाचा फरक असायला हवा. प्रशिक्षक आणि खेळाडूंमध्ये वयाचा फरक नसेल, तर ते प्रशिक्षकाचा आदर करणार नाहीत. सरफराज अहमदचा केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संघात समावेश नाही, तर त्याचा अनुभव लक्षात घेता त्याला संघाचा कर्णधारपदही द्यायला हवे होते.”
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा कसोटी संघ:
शान मसूद (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, हसन अली, इमाम उल हक, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नोमान अली, सॅम अयुब, आगा सलमान, सरफराज अहमद, सौद शकील आणि शाहीन आफ्रिदी.