भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दौऱ्यावरून आलेल्या किंवा जाणाऱ्या भारताच्या करारबद्ध क्रिकेटपटूंना प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. यासंदर्भात भारताच्या माजी क्रिकेटपटूंनी बीसीसीआयवर टीकेची झोड उठवली आहे. हे पाऊल उचलण्यामागे बीसीसआयची भूमिका काय आहे, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा या भारताच्या दोन आघाडीच्या क्रिकेटपटूंनी प्रसारमाध्यमांना मुलाखती देऊन बीसीसीआयच्या कराराचा भंग केल्याप्रकरणी नुकतीच त्यांना तंबी देण्यात आली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावरील तिरंगी मालिकेत सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी बजावल्याबद्दल रोहितने भारतात आल्यावर एक मुलाखत दिली होती. याचप्रमाणे आगामी झिम्बाब्वे दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर पुजाराने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला एकदिवसीय संघाचा नियमित सदस्य होण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते.
बीसीसीआयचा करार काय सांगतो?
बीसीसीआयच्या करारानुसार भारताच्या कोणत्याही खेळाडूला विशिष्ट दौऱ्याच्या एक महिना आधी किंवा नंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याची परवानगी नसेल. भारतातील ३९ खेळाडूंना बीसीसीआयने करारबद्ध केले आहे. ‘अ’ श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक एक कोटी रूपये, ‘ब’ श्रेणीतील खेळाडूंना ५० लाख रूपये तर ‘क’ श्रेणीतील खेळाडूंना २५ लाख रूपये मानधन देण्यात येते.
     प्रसारमाध्यमांशी बोलण्यास प्रतिबंध घालण्यास नेमके काय कारण असावे किंवा काय घडले असावे हे मला माहीत नाही. क्रिकेटला गेल्या महिन्यांमध्ये फार वाईट गोष्टींना सामोरे जावे लागते आहे. स्पॉट-फिक्सिंग आणि उत्तेजक सेवनाच्या घटनाही घडल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर सावधगिरी म्हणून ही पावले उचलण्यात आली असावी.  चंदू बोर्डे, भारताचे माजी क्रिकेटपटू
     सध्या प्रसारमाध्यमांची संख्या वाढली आहे, हे मी मान्य करतो. परंतु एखाद्या खेळाडूची कामगिरी चांगली झाली तर क्रिकेटचाहते त्याच्या भावना समजून घेण्यास उत्सुक असतात. या कामगिरीसाठी त्याने किती मेहनत घेतली आणि कोणती योजना आखली ते त्यांना जाणून घ्यायचे असते. त्यामुळे खेळाडूंना प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यापासून रोखणे हे योग्य नाही.
कीर्ती आझाद, भारताचे माजी क्रिकेटपटू

Story img Loader