सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचं कारण देऊन सध्या भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये कोणत्याही प्रकारे क्रिकेटचे सामने खेळवले जात नाहीयेत. मात्र अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना, क्रिकेटच्या माध्यमातून दोन्ही देशांमधले संबंध सुधारण्यासाठी खास प्रयत्न केले गेले होते. २००४ साली अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता.
पाकिस्तानला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाने अटलबिहारी वाजपेयींची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान अटलजींनी भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुलीला एक खास बॅट भेट दिली होती. या बॅटवर अटलजींनी, खेळासोबत मनंही जिंकून या असा संदेश लिहीला होता. या बॅटवर भारतीय संघातल्या खेळाडूंनी आपली ऑटोग्राफ दिली होती.