Former South African Umpire Rudi Koertzen Death: जागतिक क्रिकेटसाठी एक वाईट बातमी मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी पंच रुडी कोर्टझेन यांचे आज (९ ऑगस्ट) निधन झाले आहे. ७३ वर्षीय रुडी मुळचे दक्षिण आफ्रिकेचे होते. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार एका रस्ते अपघातामध्ये रुडी याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतील रिव्हरडेल नावाच्या परिसरात मंगळवारी सकाळी झालेल्या अपघातात रुडी कोर्टझेन आणि अन्य तीन जणांचा मृत्यू झाला. या अपघातात गाड्यांची समोरासमोर टक्कर झाली होती. रुडी हे क्रिकेटमधील सर्वोत्तम पंचांपैकी एक होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३३१ सामन्यांमध्ये त्यांनी पंच म्हणून काम केले होते.
१९९२मध्ये पोर्ट एलिझाबेथ येथे दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली होती. त्यांनी विक्रमी २०९ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि १४ ट्वेंटी २० सामन्यांमध्ये पंचाची भूमिका पार पाडली होती. १९९९च्या विश्वचषकात इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात अंपायरिंग केल्याबद्दल ते नेहमीच लक्षात राहतील.
याशिवाय, २००३ आणि २००७च्या विश्वचषकांतील अंतिम सामन्यात ते ‘तिसरे पंच’ होते. २०१०मध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामन्यानंतर कोर्टझेन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. कोर्टझेन यांच्या निधनानंतर क्रिकेट जगतातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग फार भावूक झाला आहे. त्याने ट्वीट करून कोर्टझेन यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.