India vs Australia World Cup Final 2023: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. यासह ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यात यश आले. टीम इंडियाने २०१३ पासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही आणि आता प्रतीक्षा आणखी लांबली आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांपासून ते मैदानावर उपस्थित भारतीय खेळाडूंपर्यंत सर्वांचीच निराशा झाली. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज मैदानावरच रडू कोसळले. दुसरीकडे, रोहित शर्माला भावना अनावर झाल्या. यावर भारताचे माजी खेळाडू कपिल देव यांनी टीम इंडियाचे सांत्वन केले असून, संघाला धीर दिला आहे.
कपिल देव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये स्टेट्स ठेवले आहे. त्यात ते म्हणतात की, “रोहित तू जे काही करतोस किंवा जे काही केलेस ते अविश्वसनीय आहे. तू तुझ्या फलंदाजीत मास्टर आहेस. अजून पुढे खूप यश तुमच्या प्रतीक्षेत आहे, हे मला माहीत आहे. मात्र, त्यासाठी तुम्ही तुमचा उत्साह कायम ठेवा. संपूर्ण भारत तुमच्या बरोबर आहे.” त्यांचे हे स्टेट्स सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
ड्रेसिंग रूममध्ये टीम इंडियाला आपले अश्रू लपवता आले नाहीत
ड्रेसिंग रूममध्ये काल वातावरण खूप भावनिक होते. केवळ सिराजच नाही तर संघातील इतर खेळाडूही मैदानावर आपले अश्रू लपवताना दिसले, परंतु हे सर्वजण ड्रेसिंग रूममध्ये स्वत:ला रोखू शकले नाहीत. ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना रडताना पाहून संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड स्वत:ला रोखू शकले नाहीत. याचा उल्लेखही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला, “होय, तो (रोहित) निराश झाला आहे. ड्रेसिंग रूममध्ये अनेक खेळाडू निराश झाले आहेत. ड्रेसिंग रूममध्ये सगळेच भावूक झाले होते. हे पाहणे एक प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी खूप कठीण होते. या लोकांनी किती कष्ट घेतले हे मला माहीत आहे. मला त्यांचे योगदान माहीत आहे.”
तो पुढे म्हणाला, “गेल्या महिन्यात आम्ही किती मेहनत घेतली, कसले क्रिकेट खेळलो हे सर्वांनी पाहिले. हा एक खेळ आहे आणि खेळांमध्ये अशा गोष्टी घडतात. कदाचित आज चांगला संघ जिंकला असेल, पण उद्या सकाळी नवा सूर्य उगवेल आणि तो आपला असेल. आपण आपल्या चुकांमधून शिकू आणि यातून मोठी भरारी घेऊ. आपण स्वत: ला जर पणास लावले नाही तर मोठा पल्ला गाठू शकणार नाही. यातून संघाने खूप काही शिकले आहे.” टीम इंडियाने या स्पर्धेतील सर्व गट सामने जिंकले आणि उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. याच संघाने या स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या गट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता, मात्र अंतिम सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.