मॉस्को
बुद्धिबळाचे माजी जगज्जेते सोव्हिएतचे बोरिस स्पास्की यांचे गुरुवारी मॉस्को येथे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. बुद्धिबळातील या प्रतिभावान खेळाडूच्या मृत्यूची घोषणा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने केली. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कुठलेही कारण देण्यात आलेले नाही.
सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्यांची गणना केली जाते. अमेरिका आणि सोव्हिएत यांच्यातील त्या वेळी सुरू असलेल्या शीतयुद्धाच्या काळातील बॉब फिशर आणि स्पास्की हे पारंपरिक प्रतिस्पर्धी होते. या दोघांच्या लढतीकडे कायम जगाचे लक्ष असायचे. जागतिक विजेतेपदाच्या लढतीत १९७२ मध्ये स्पास्की यांना फिशर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
स्पास्की यांनी बुद्धिबळ खेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. फिशर आणि स्पास्की यांच्यातील १९७२ मधील जगज्जेतेपदाची लढत दूरचित्रवाणीवरून प्रसारित करण्यात आली होती. त्या वेळी हा सामना प्रचंड गाजला होता. शतकातील सर्वोत्तम सामना म्हणून हा सामना ओळखला गेला. आइसलँडमधील रेकजाविक येथे खेळला गेलेला हा सामना न्यू यॉर्कच्या ब्रुकलिन येथील १९ वर्षीय फिशरने जिंकून अमेरिकेला पहिले जागतिक विजेतेपद मिळवून दिले. यानंतर पुढील वर्षी फिशर यांनी हे विजेतेपदाचे रक्षण करण्यास नकार दिला होता. फिशर यांचे २००८ मध्ये निधन झाले.
बुद्धिबळ जगतात स्पास्की यांची बंडखोर खेळाडू म्हणून ओळख होती. याची आठवण माजी जगज्जेता गॅरी कास्पारोव्हने ‘एक्स’वरून करून दिली. स्पास्की सर्वोत्तम खेळाडू होते यात शंका नाही. पण, त्यांनी कधीही पुढील पिढीला अगदी तो सोव्हिएतचा असला, तरी त्याला मार्गदर्शन केले नाही. ते १९७६ मध्ये फ्रान्समध्ये स्थलांतरित झाले, असे कास्पारोव्हने म्हटले आहे. बुद्धिबळ महासंघाने आपल्या संकेतस्थळावर स्पास्की आणि फिशर यांच्यातील सामन्याला इतिहासातील सर्वोत्तम सामना म्हणून मान्यता दिली आहे.
प्रतिस्पर्ध्याच्या विविध चाली ओळखून त्यानुसार जुळवून घेण्याची कला स्पास्की यांच्या खेळात होती, असे युगोस्लाव्हियाचा ग्रँडमास्टर स्वेतोझर ग्लिगोरिक यांनी म्हटले आहे. स्पास्की खऱ्या अर्थाने सार्वत्रिक सर्वोत्तम खेळाडू होते. त्यांच्याकडून कधीच चांगली सुरुवात झाली नाही. पण, अत्यंत कठीण अशा डावाच्या मध्यात ते कमालीचा गतिमान खेळ करायचे आणि हे त्यांचे कौशल्य होते. त्यांच्या काळात सोव्हिएत युनियनने जागतिक अजिंक्यपद स्पर्धांची एक अखंड मालिका तयार केली, असे बुद्धिबळ महासंघाने म्हटले आहे.
फिशरकडून जागतिक विजेतेपदाची लढत गमाविल्यावर मात्र त्याचे तेव्हाच्या सोव्हिएत युनियनमध्ये थंडे स्वागत झाले होते. त्याला देश सोडण्याचीही परवानगी नाकारण्यात आली होती. बुद्धिबळाचा पट हे स्पास्की यांना दुसरे घर वाटायचे. त्यांनीच २०२२ मध्ये बुद्धिबळ चेस हॉल ऑफ फेमने प्रकाशित केलेल्या फिशरविरुद्धच्या सामन्याविषयी बोलताना म्हटले होते. आमच्या बुद्धिबळाच्या खेळाला राज्यासारख्या सीमा नाहीत. मला बुद्धिबळाच्या पटाकडे बघितले की घरी असल्यासारखे वाटते, असे स्पास्की त्या वेळी म्हणाले होते.