After losing the world cup 2023 title KL Rahul and Kuldeep Yadav shared an emotional post : कुलदीप यादवने गुरुवारी कबूल केले की विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यातील पराभवाचे दुखणे त्याला आयुष्यभर सतावत राहील. ही वेदना त्याला पुढील संधीसाठी अधिक मेहनत करण्यास प्रवृत्त करत राहील. भारतीय संघाने साखळी फेरीत आणि उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून अंतिम फेरी गाठली होती, मात्र निर्णायक सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात त्याला अपयश आले. यानंतर त्याचे १२ वर्षापासून विजेतेपदाचे स्वप्नही अधुरे राहिले. अंतिम सामन्यातील पराभवानंतर सर्वच खेळाडू निराश झाले आहेत.
भारतीय फिरकीपटूने एक्सवर पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी लिहिले, “चेन्नई ते अहमदाबाद या प्रवासाचा परिणाम आमच्यासाठी निराशाजनक होता, तरी आम्हाला गेल्या सहा आठवड्यांच्या कामगिरीचा अभिमान आहे. हे दुःख असूनही, पुढील संधीमध्ये आम्ही अधिक मेहनत करण्यास कटिबद्ध आहोत.” त्याने पुढे लिहिले की, ‘पराजयाचे दुखणे सतावत राहील, पण आपल्याला त्यावर मात करावी लागेल. आयुष्य पुढे जातं आणि वेदनांवर मात करायला वेळ लागतो. विश्वचषक स्पर्धा खूप सुंदर झाली, पण देवाचा काही वेगळाच हेतू होता असे वाटते.”
कुलदीपने पुढे लिहिले की, “आता भूतकाळ विसरून पुढे जाण्याची वेळ आली आहे. या पराभवातून पुढे जाणे खूप कठीण आहे, पण भविष्यातील प्रवासासाठी आमचा आत्मविश्वास वाढला आहे. तसेच सर्व स्टेडियममध्ये चाहत्यांकडून मिळालेल्या सन्मानाने आमच्या हृदयाला स्पर्श केला, ज्यामुळे आम्हाला आणखी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली. भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.”
हेही वाचा – IND vs AUS: सूर्यकुमार यादवच्या पहिल्या पत्रकार परिषदेत घडला विचित्र प्रकार; नवीन कर्णधार म्हणाला, “फक्त..”
त्याचबरोबर भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने जेतेपद हुकल्यानंतर चार दिवसांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. केएल राहुलने एक्सवरील पोस्टमध्ये लिहले, “जेतेपद हुकल्यानंतर अजूनही वेदना होत आहेत.”
अंतिम सामन्याबद्दल बोलायचे तर, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रथम फलंदाजी करायला उतरलेला भारतीय संघ ५० षटकांत २४० धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत ४ विकेट गमावत २४१ धावा करत सामना जिंकला. कांगारू संघासाठी ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक १३७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. मार्नस लाबुशेनने नाबाद ५८ धावा केल्या.
तत्पूर्वी, भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ६६ आणि विराट कोहलीने ५४ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने ४७ आणि सूर्यकुमार यादवने १८ धावा केल्या. कुलदीप यादवने १० धावांचे योगदान दिले. या पाच खेळाडूंशिवाय इतर कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. त्याचबरोबर भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेत सलग १० सामने जिंकले होते, मात्र ११व्या सामन्यात संघ मागे पडला. भारताला दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने शेवटचा पराभव २००३ मध्ये केला होता.