स्थानिक खेळाडू अंकुशितासह ज्योती, शशी अंतिम फेरीत
यजमान म्हटले की स्थानिक खेळाडूंना हुरूप येणे आणि त्या हुरूपाने आत्मविश्वास उंचावणे हे ओघाने आलेच. मात्र त्याचे अतिआत्मविश्वासात रूपांतर होऊ न देणे आणि लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करणे, ही खरी कसरत आहे. गुवाहाटी येथे सुरू असलेल्या एआयबीए जागतिक युवा महिला अजिंक्यपद स्पध्रेत भारतीय बॉक्सिंगपटूची अशीच कसरत सुरू आहे. त्यांची घोडदौड विजयी मार्गावर सुरू असली तरी कुठेतरी अतिआत्मविश्वास त्यांना किंचितसा महागात पडत असल्याचे चित्र जाणवले. भारतीयांसाठी सुखद बाब इतकीच की त्याचे अद्याप पराभवात रूपांतर झालेले नाही.
शुक्रवारी ५१ किलो वजनी गटात भारताच्या ज्योतीने प्रेक्षकांची धाकधूक अशीच वाढवली, परंतु त्वरित सावरत तिने कझाकस्तानच्या झांसाया अॅबड्रॅईमोव्हावर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. ‘‘या विजयाचा आनंद नक्कीच आहे, परंतु दुसऱ्या फेरीत डावपेच चुकल्याचा फटका बसला असता प्रशिक्षकांनी मला पदलालित्याचा कौशल्यपूर्ण वापर करून प्रतिस्पर्धी चकवण्यास सांगितले होते. मात्र, मी एकाच जागी उभी राहत होती आणि त्याचा फायदा उचलताना झांसाया मला मागे जाण्यास भाग पाडून गुण वसूल करत गेली. सुदैवाने तिसऱ्या फेरीत मी पुनरागमन करण्यात यशस्वी झाले,’’ असे ज्योतीने सांगितले.
उपांत्य फेरीत हरयाणाच्या या खेळाडूने ४-१ असा विजय मिळवला. जेतेपदाच्या लढतीत ज्योतीसमोर रशियाच्या एकाटेरिना मोलचॅनोव्हाचे आव्हान असणार आहे. रशियाच्या बॉक्सिंगपटूने जपानच्या रिंका किनोशितावर ५-० असा सहज विजय मिळवला. ‘‘रशियाच्या खेळाडूविरुद्ध जराशीही चूक महागात पडेल, याची जाण आहे. त्यामुळे उपांत्य फेरीतील सामन्यातील कामगिरीतून बोध घेत सुवर्णपदक जिंकण्यासाठी झोकून खेळ करेन,’’ असा विश्वास ज्योतीने व्यक्त केला.
सैनिकाची मुलगी असलेल्या शशी चोप्राने ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तिने मंगोलियाच्या नामून मोनखोरवर ५-० असा सहज विजय मिळवला. शशीला कांजण्या आल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे तिच्या कामगिरीवर सर्वाच्या नजरा खिळल्या होत्या. तिने आपल्या कामगिरीने सर्वाना निरुत्तर करीत अंतिम फेरीत कूच केली. ‘‘मी नेहमी सरळ ठोसे मारणे पसंत करते आणि याही लढतीत तेच केले. मंगोलियाच्या खेळाडूला डोके वर काढण्याची संधी मी दिली नाही,’’ असे शशीने सांगितले. तिच्या प्रत्येक फटक्याने मंगोलियाची खेळाडू हतबल होताना पाहायला मिळाली. आक्रमकतेबरोबरच शशीने बचावातही चपखल खेळ करताना प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
स्थानिक खेळाडू अंकुशिता बोरोने उपांत्य फेरीतही आपला उल्लेखनीय खेळ कायम राखला. महाविद्यालयातील मित्र-मैत्रीणींसमोर अंकुशिताचा खेळ अधिक प्रभावी झाला. उंचीने कमी असलेल्या थालयंडच्या साकस्री थँनचानोकला ठोसे लगावताना अंकुशिताला अडचण होत होती. ‘‘थायलंडच्या खेळाडूची उंची माझ्यापेक्षा कमी असल्याने तिच्या चेहऱ्यावर ठोसे लगावताना थोडी अडचण होत होती. माझे ठोसे तिच्या डोक्यावरून जात होते आणि त्यामुळे प्रशिक्षकांच्या सांगण्यानुसार मी पायांच्या हालचालीत बदल करून थोडासा वाकून खेळ केला. त्यामुळे यश मिळवता आले. अंतिम फेरीत सर्वस्व पणाला लावणार,’’ असे अंकुशिताने सांगितले. गुवाहाटीच्या अंकुशिताने ५-० अशा फरकाने हा सामना जिंकला.