योगेश्वर दत्तसह भारताच्या चार कुस्तीपटूंनी इटली येथील सस्सारी शहरात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पध्रेत सुवर्णपदकांची कमाई केली. योगेश्वरने ६५ किलोवजनी गटात, प्रविण राणाने ७० किलो वजनी गटात बाजी मारली. अमित कुमार आणि मुंबईकर नरसिंग यादव यांनीही अनुक्रमे ५७ व ७४ किलो वजनी गटात जेतेपद पटकावले. या स्पध्रेत मौसूम खत्री (९७ किलो) आणि हितेंदर (१२५ किलो) हेही जेतेपदाच्या शर्यतीत आहेत.
 जागतिक कुस्ती महासंघाने २०१३ सालच्या अखेरीस विविध वजनी गटांचा समावेश केला. त्यामुळे योगेश्वरला ६० किलो वजनी गटातून ६५ किलो वजनी गटात खेळावे लागले. २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वरने ६० किलो वजनी गटात कांस्य जिंकले होते. वजनी गटातील बदलांनंतर योगेश्वरने आत्तापर्यंत सहभाग घेतलेल्या चारही स्पर्धामध्ये सुवर्ण जिंकण्यात यश मिळवले आहे. योगेश्वरने गतवर्षी याच स्पध्रेत सुवर्णपदक जिंकून नवीन वजनी गटातील आपली छाप सोडण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने ग्लास्गोत झालेल्या राष्ट्रकुल आणि इंचियोनमध्ये झालेल्या आशियाई स्पध्रेत सुवर्णपदकावर नाव कोरले होते.

Story img Loader